टीसीच्या धक्क्याने महिलेचा रेल्वेतून पडून मृत्यू

May 29, 2014 7:01 PM0 commentsViews: 3069

434jalgaon_trainaccident29 मे : जळगाव रेल्वे स्थानकात टीसीचा धक्का लागल्यामुळे रेल्वेतून पडून एका महिलाचे मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडलीय. उज्ज्वला पंड्या (32) असं या महिलेचं नाव आहे. या प्रकरणी टीसी साळुंखेला अटक केली आणि नातेवाईकांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी संपत साळुंखेविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला.

जळगाव रेल्वे स्थानकावर राजेंद्रनगर जनता एक्स्प्रेसच्या डब्यात शिरण्याच्या प्रयत्नात असणार्‍या पंड्या यांना दारुच्या नशेत असणार्‍या टीसीने ढकलल्याचा आरोप पंड्या यांच्या नातेवाईकांनी केला आहे. उज्ज्वला पंड्या यांचं एसी डब्याचं आरक्षण होतं आणि आपल्या मुलीला गाडीत चढवल्यानंतर त्या स्वत: गाडीत चढण्याच्या प्रयत्नात होत्या. पंड्या यांच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार टीसी संपत साळुंखे यांनी पंड्या यांना हात देऊ केला आणि गाडीत चढण्याची ऑफर दिली.

 

मात्र पंड्या यांनी त्याला नकार देत स्वत:च गाडीत चढण्याचा प्रयत्न केला.त्यातच रेल्वेही सुरू झाली आणि टीसी साळुंखे यांनी पंड्यांना धक्का दिला. फलाट आणि रुळाच्या मध्ये पडल्याने उज्ज्वला पंड्या यांचा जागीच मृत्यू झाला. उज्ज्वला पंड्या रुळावर कोसळल्याचं कळताच टीसी संपत साळुंखे घाबरुन रेल्वेच्या पँट्रीकारमध्ये लपून बसला. पण घटना पाहिलेल्या प्रवाशांनी त्याला जबरदस्त मारहाण सुरू केली. पोलिसांनी मध्यस्थी करुन टीसी साळुंखेला अटक केली आणि नातेवाईकांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी संपत साळुंखेविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close