केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार, सेनेला आणखी मंत्रिपदं मिळणार?

May 29, 2014 9:12 PM1 commentViews: 4292

787team_modi29 मे : लोकसभेत घवघवीत यश मिळवल्यानंतर 26 मे रोजी नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली त्यांच्यासोबत 45 मंत्र्यांनी शपथ घेतली. मोदींची टीम तयार झाली असली तरी मोदींच्या मंत्रिमंडळाचा आणखी विस्तार होणार आहे. येत्या 15 जूननंतर कॅबिनेटच्या विस्ताराची शक्यता वर्तवली जात आहे. अधिवेशनाच्या सत्रापूर्वी ही विस्ताराची शक्यता आहे.

यात राज्यमंत्र्यांसह 25 मंत्र्यांचा समावेश होण्याची शक्यता असल्याची सूत्रांची माहिती आहे. यात प्रामुख्याने राज्यमंत्री असतील. शिवाय संरक्षण मंत्रालयालाही नवा मंत्री मिळण्याची शक्यता आहे. या विस्तारामध्ये मित्रपक्षांना आणखी जागा मिळण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. सध्या या मंत्रिमंडळात कॅबिनेट आणि राज्य मिळून 45 मंत्री आहेत. यामध्ये एनडीएच्या महत्त्वाच्या घटकांना चांगल्या जागा मिळण्याची शक्यता आहे.

त्यामुळे कमी दर्जाच मंत्रिपद मिळाल्यामुळे नाराज असलेल्या शिवसेनेसाठी पुन्हा एक नवी संधी चालून आली आहे. अवजड खाते स्वीकारत असताना अनंत गीतेंनी ही याबाबत संकेत दिले होते त्यामुळे या मंत्रिमंडळ विस्तार सेनेच्या पदरात आणखी मंत्रिपद मिळणार का ? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. दरम्यान, आज दुसर्‍या दिवशी मोदींनी आपला 10 कलमी कार्यक्रम जाहीर केला.

नरेंद्र मोदींचा  अजेंडा

 • अर्थव्यवस्थेत वाढती गुंतवणूक आणि पायाभूत सुविधांवर लक्ष
 • नवीन कल्पनांचं स्वागत आणि अधिकार्‍यांना काम करण्याचं स्वातंत्र्य
 • शिक्षण,आरोग्य, पाणी, ऊर्जा आणि रस्ते या व्यवस्थांवर भर
 • कामकाजात पारदर्शकता, सरकारी कामांसाठी ई- टेंडरचा वापर
 • सरकारची धोरणं संपूर्ण सरकारी यंत्रणेपर्यंत पोचवणं आणि यंत्रणा लोकाभिमुख करणं
 • विविध मंत्रालयांमध्ये चांगला समन्वय
 • महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी अधिकार्‍यांमध्ये विश्वास निर्माण करणं
 • लोकांसोबतचा संवाद वाढवण्यासाठी टेक्नॉलॉजी आणि सोशल मीडियाचा वापर
 • स्थिर सरकार आणि दूरगामी धोरणांवर भर
 • ठराविक वेळेत धोरणांची अंमलबजावणी

4 जून ते 12 जून संसदेचं अधिवेशन

संसदेचं अधिवेशन 4 जून ते 12 जून या काळात घेण्याचा निर्णय मंत्रिमंडळानं घेतला आहे. 4 आणि 5 जूनला नवीन खासदारांचा शपथविधी होईल. 6 जूनला लोकसभेच्या अध्यक्षांची निवड होईल. नवीन लोकसभा अध्यक्षांची निवड होईपर्यंत कमलनाथ हंगामी अध्यक्ष काम पाहतील. 9 जूनला राष्ट्रपती संसदेच्या दोन्ही सभागृहांना संबोधित करतील तर 10 आणि 11 जूनला राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर चर्चा होईल.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

 • Shailesh

  कसल्या दळभद्री बातम्या छापता हो! शिवसेनेला किती जागा, मग ते नाराज होणार का…. तुम्हाला पत्रकार म्हणून स्वायत्तता मिळाली आहे ती सुयोग्य दिशा देण्यासाठी कि काड्या घालून वाद निर्माण करण्यासाठी? युतीचा अंतर्गत प्रश्न आहे, त्यांचे ते बघून घेतील. तुम्ही कारभारावर लक्ष ठेवा आणि त्याविषयी बोला!

close