दादर पब्लिक ब्रिजची फेरीवाल्यांच्या गर्दीतून सुटका

April 14, 2009 12:56 PM0 commentsViews: 6

14 एप्रिल,दादरचा पब्लिक ब्रिज म्हणजे फेरीवाल्यांचा अड्डा. फेरीवाल्यांची गर्दी हे या ब्रिजवरचं सामान्य चित्र आहे. पण आता गेल्या काही दिवसांपासून हे चित्र बदललंय. या ब्रिजची फेरीवाल्यांच्या गर्दीतून सुटका झाली आहे. हा ब्रिज हॉकर्स फ्री म्हणजेच फेरीवालेरहीत जाहिर करण्यात आला आहे. या ब्रिजवर हा बदल घडवून आणण्यात मोठा सहभाग, इथल्या रहिवाशांचा आहे. रहिवाशांनी एकत्रित होऊन, पोलिसांच्या मदतीनं हा ब्रीज आता हॉकर्सफ्री केला आहे.एवढंच नव्हे तर हे फेरीवाले परत येऊ नये याकडेही लक्ष ठेवण्यात येत आहे. 'आम्ही महिनाभर पाठपुरावा केला. ब्रिजवर लक्ष ठेवलं. फेरीवाले आले तर लगेच पोलिसांना कळवलं' असं इथल्या अरुण सकपाळ या रहिवाशाने सांगितलं. दादरचा हा ब्रिज 1985 साली बीएमसीनं बांधला होता. हा पब्लिक ब्रिज दादर पूर्व-पश्चिमला जोडणारा आहे. जवळपास पाच लाख लोक दररोज ह्या ब्रिजचा वापर करतात. यावर फेरीवाल्यांच्या गर्दीमुळे इथल्या रहिवाशांनाच नव्हे तर प्रवाशांनाही अनेक प्रकारचे त्रास सहन करावे लागत होते. प्रामुख्याने फेरीवाल्यांची दादागिरी हा मोठाच त्रास होता. रात्री अपरात्री या ब्रिजवरुन प्रवास करायला लोकांना भीती वाटत होती. इथले दररोजचे प्रवासी संजय दास्ताने म्हणतात,' फेरीवाल्यांची दादागिरी एवढी वाढली होती ते कधीकधी मारहाणही करायचे. त्यामुळे हा ब्रिज प्रवाशांसाठी आहे की फेरीवाल्यांसाठी हेच समजत नव्हतं.' इथल्या रहिवाशांना आपला ब्रिज असाच फेरीवाल्यांच्या गर्दीपासून मोकळा ठेवायचा असेल, तर सतत ब्रिजवर लक्ष ठेवलं पाहिजे. यापूर्वीही असेच काही प्रयत्न करण्यात आले होते. कालांतरानंतर त्यात पोलिसांचं व रहिवाशांचं लक्ष कमी पडल्यावर, अगदी थोडा काळच त्या प्रयत्नांना यश मिळालं. याआधी केलेल्या प्रयत्नांनंतर एक दिवसापेक्षा जास्त कधीही हा ब्रिज हॉकर्स फ्री राहीला नाही. पण यंदा मात्र, महिन्याभरापासून ब्रिज हॉकर्स फ्री ठेवण्यात यश आलं आहे. हा ब्रिज असाच मोकळा रहावा यासाठी इथल्या रहिवाशांचे प्रयत्न सुरू आहेत.

close