फिल्म रिव्ह्यु : आंधळी कोशिंबीर

May 30, 2014 11:01 PM0 commentsViews: 2043

अमोल परचुरे, समीक्षक

आंधळी कोशिंबीर…अतिशय तगडी स्टारकास्ट, ठेका धरायला लावतील अशी गाणी आणि इंटरेस्टिंग प्रोमोमुळे हा सिनेमा खळखळून हसवणार असंच वाटलं होतं. काही प्रमाणात ही अपेक्षा पूर्णही झाली, पण कथेच्या पातळीवर कमजोर असल्यामुळे एक परिपूर्ण विनोदी सिनेमा बघण्याचं भाग्य काही लाभलं नाही. विनोदी सिनेमात लॉजिक असायलाच पाहिजे असा काही नियम नाही, अनेक गाजलेल्या उत्कृष्ट विनोदी क्लासिक्समध्ये लॉजिक शोधायला गेलं तर आपलीच फजिती होईल. पण पडद्यावर जे काही सुरू आहे ते काही प्रमाणात पटायला हवं किंवा कथेचा वेग असा पाहिजे की, मग लॉजिक वगैरे गोष्टींचा विचार करायला वेळच मिळणार नाही. नेमकी इथेच ‘आंधळी काशिंबीर’ची गोची झाली आहे. पुणेकरांच्या स्वभावाची झकास अर्कचित्रं उभी करताना त्यात कथेचा मसाला भरण्यात लेखक-दिग्दर्शक कमी पडलेत. विनोदी सिनेमा फुलवण्यासाठी किंवा कथा पुढे नेण्यासाठी जे नाटय आवश्यक असतं, त्याचं प्रयोजनच इथे चुकलेलं आहे. प्रियदर्शनच्या सिनेमात जो गोंधळ आपल्याला दिसतो त्याची विचारपूर्वक रचना केलेली असते, तसं झालं तरच त्यातला गुंता सुटताना प्रेक्षकालाही मजा येते, पण अशी मजा आंधळी कोशिंबीर बघताना येत नाही आणि मग सर्व कलाकारांचा धमाल अभिनय एंजॉय करणं एवढंच आपल्या हातात उरतं.

काय आहे स्टोरी?

ak5

आंधळी कोशिंबीरची कथा घडते पुण्यामध्ये…बापू सदावर्ते आणि शांती चिटणीस या महत्त्वाच्या व्यक्तिरेखा..दोघेही अगदी तत्त्वनिष्ठ, कुणी नियम मोडत असेल तर त्याला तिथेच इंगा दाखवणारे..यांच्याशिवाय सिनेमात बापू सदावर्तेंचा मुलगा रंगा आणि त्याचा मित्र वसंत आहेत. शांती चिटणीसची मुलगी आहे, रंगाची प्रेयसी आहे. गोरक्ष नावाचा राजकीय गुंड आहे. दुष्यंत मारणे नावाचे वकील आहेत. सुरुवातीला एक-एक व्यक्तिरेखेची ओळख होत जाते, तो भाग चांगला मजेशीर आहे, म्हणजे पुढे आता आणखी भरपूर मजा येणार अशी आशा निर्माण करणारा आहे. प्रत्यक्ष कथेला सुरुवात झाल्यानंतर उलट धमाल कमी व्हायला लागते. लॉजिकचा विचार करायचा नाही असं जरी ठरवलं तरी यातली माणसं जे वागतात ते पूर्णपणे पटत नाही आणि मग कथेसाठी सगळं जुळवून आणलंय असंच वाटत राहतं. पण तरीही अशोक सराफ-वंदना गुप्ते यांच्या अभिनय बर्‍याच त्रुटी विसरायला लावतो, हेही मान्य करायला लागेल.

नवीन काय?

35786919

वकील दुष्यंत मारणेंचा नटसम्राट थाटातला एक प्रवेश, कोर्टरुम ड्रामा आणि क्लायमॅक्समधला बराचसा भाग याला जर कात्री लावली असती तर ही कोशिंबीर बघताना आणखी करमणूक झाली असती. सिनेमातल्या गाण्यांनी आणि पार्श्वसंगीताने मात्र मजा नक्कीच वाढवली आहे. अवधूत गुप्तेने गायलेल्या टायटल साँगने सिनेमाची एनर्जेटिक सुरुवात झालीये. भैरु गाण्यावर तर प्रेक्षक थिएटरमध्येच ताल धरतील एवढं ते गाणं ठसकेबाज झालंय. अवधूत आणि जान्हवी प्रभू-अरोरा यांनी वेगळ्याच बाजातली धमाल गायकी या गाण्यात सादर केलीये. अशोक सराफ आणि वंदना गुप्ते यांच्यावर चित्रित झालेलं रोमँटिक आणि हळुवार गाणंही सुंदर झालंय. अविनाश-विश्वजीत, नरेंद्र भिडे आणि गीतकार वैभव जोशी यांनी खरंच रसिकांना म्युझिकल ट्रीट दिलेली आहे. आता संवादांबद्दल..संवादांमध्ये आणखी एकसंधपणा हवा होता. काही ठिकाणी संवाद चटपटीत-चुरचुरीत आहेत, तर काही ठिकाणी संवादांत तोचतोचपणा आहे.

 

परफॉर्मन्स

सतत सोशल मीडियावरील स्टेटसचा विचार करणार्‍या आजच्या पिढीची खिल्ली उडवण्याची कल्पना चांगली आहे, पण त्याचा अजून चांगला आणि जास्त वापर व्हायला हवा होता. आंधळी कोशिंबीरमध्ये सध्याचे आघाडीचे आणि लोकप्रिय कलाकार आहेत. त्यात प्रिया बापटची व्यक्तिरेखा सुरुवातीला इंटरेस्टिंग वाटते, पण नंतर तिला काही स्कोपच ठेवलेला नाही. मृण्मयी देशपांडेने काम एकदम कडक केलंय पण तिच्या व्यक्तिरेखेचा काहीच बोध होत नाही. केवळ विनोदनिर्मितीसाठी तिला वेडसर केलंय असंच वाटत राहतं. अनिकेत विश्वासराव आणि हेमंत ढोमे यांची जोडगोळी सिनेमात चांगलीच जमून आलीये. तेंडुलकर आऊटनंतर आता या सिनेमात अनिकेतने आपण कॉमेडी उत्तम करू शकतो हे दाखवून दिलंय. दुष्यंत मारणेच्या रुपात आनंद इंगळेची धमाल सुरुच असते, ‘थ्री इडियट्स’मधल्या बोमन इराणीसारखा विग लावून आनंदचं वय वाढवण्याचा प्रयत्न झालाय पण तसं काही वय वाढलेलं जाणवत तरी नाही. हृषिकेश जोशीच्या व्यक्तिरेखेवरही लिखाणात अन्यायच झालेला आहे.

ak

पण ज्या काही सिनेमातल्या त्रुटी असतील त्यावर मात केलीये अशोक सराफ आणि वंदना गुप्ते यांनी..अशोक सराफ यांना मागे एका कार्यक्रमात सम्राट ही पदवी देण्यात आली होती, पण ‘आंधळी कोशिंबीर’ बघून वाटतं की यापेक्षा खूप मोठी पदवी त्यांना द्यायला पाहिजे. त्यांनी केलेला चेहर्‍याचा वापर, छोट्या छोट्या जागा काढून केलेली विनोदनिर्मिती सगळंच अफलातून आहे. अशोक सराफ फॅन्सचं फक्त एकदा हा सिनेमा बघून समाधान होणार नाही असा त्यांच्या अभिनयाचा रुबाब आहे, आणि त्यांना तगडी साथ मिळालीये ती वंदना गुप्ते यांची..गेल्यावर्षी ‘टाईमप्लीज’मध्ये छोट्या रोलमध्ये वंदना गुप्ते यांनी जशी धमाल केली होती, त्याचाच पुढचा भाग त्यांनी आता आंधळी कोशिंबीरमध्ये सादर केलाय. काय मस्त जोडी जमलीये दोन्ही महान कलाकारांची..बाकी चुकांकडे दुर्लक्ष करुन केवळ या जोडीसाठी एकदा हा सिनेमा तुम्ही नक्कीच बघू शकता.

रेटिंग 100 पैकी 50

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close