घोषणा चांगली पण योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ -मुंडे

May 31, 2014 7:30 PM0 commentsViews: 4940

34534munde

31 मे : ‘देशात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र’ ही चांगली घोषणा आहे पण मुख्यमंत्री कोण होणार याबद्दलचा निर्णय अजून घेतलेला नाही, त्यामुळे कुणाला जर काही वाटत असेल तर त्यात गैर नाही पण योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ असं सुचक वक्तव्य भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे केलंय. येणार्‍या विधानसभा निवडणुकासाठी महायुती एकत्रपणेच सामोरं जाईल आणि मुख्यमंत्री हा महायुतीचाच होईल असंही मुंडेंनी स्पष्ट केलं. ते औरंगाबादमध्ये बोलत होते.

दोनच दिवसांपूर्वी भाजपचे नेते विनोद तावडे यांनी विधानसभा गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाखाली लढणार पण मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार दिल्लीची कमिटीच ठरवणार असल्याचं म्हटलं होतं. तावडे यांनी एकाप्रकारे मुंडेंच्या इराद्यांना हवा देण्याचा प्रयत्न केला. गेल्या आठवड्याभरापासून भाजप आणि शिवसेनेत मुख्यमंत्री कोण होणार यावरुन रस्सीखेच सुरू आहे. “देशात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र” अशी घोषणा भाजपच्या कार्यकर्त्यांनी दिली. भाजपच्या या घोषणेमुळे सेनेच्या गोटात अस्वस्था पसरली.

एवढंच नाहीतर लोकसभा निकालाच्या दिवशी भाजपने विधानसभा कुणाच्या नेतृत्वाखाली लढणार यासाठी हालचाल सुरू केली. सेनेनंही आपण मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आहोत हे सांगण्यासाठी पोस्टरबाजी करून ‘अब की बार उद्धव ठाकरे सरकार’ असा संदेश दिला होता. कालच उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपण मुख्यमंत्री व्हावं ही कार्यकर्त्यांची इच्छा आहे असं सांगून थेट स्पर्धेत उडी घेतली. आता मुंडे यांनी यावर खुलासा करत घोषणा चांगली आहे पण निर्णय योग्य वेळी घेऊ असं सांगून हवेचा रोख बदलला आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close