‘राज’गर्जना, विधानसभा निवडणूक लढवणार !

May 31, 2014 8:43 PM1 commentViews: 6716

756858raj31 मे :31 मे : “मला तुमच्याशी काही बोलायचंय’ असं सांगून मी, ाुम्हाला इथं यासाठीच बोलावलंय, यातला जो ‘काही’ आहे त्याचा अर्थ असा की, राज ठाकरे स्वत:हा विधानसभेची निवडणूक लढणार” अशी घोषणा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली. तसंच विधानसभेत अपेक्षित यश मिळाले तर नेतृत्वही करेन असं सांगून मुख्यमंत्रीपदाची इच्छा राज व्यक्त केली. राज यांनी घोषणा करताच मनसैनिकांनी एकच जयघोष करत सभा डोक्यावर घेतली, ‘राज ठाकरे तूम आगे बढो’ या घोषणांनी मनसेसैनिकांनी परिसर दणाणून सोडला. लोकसभेत दारुण पराभवानंतर राज ठाकरे यांची मुंबईतील चुन्नाभट्टी इथं सोमय्या मैदानावर विराट सभा पार पडली.

या लोकसभा निवडणुकीत मनसेची ‘औकात’ दाखवून देईन अशी गर्जना करुन लोकसभेत उडी घेतलेल्या राज यांना मतदारांनीच ‘औकात’ दाखवली. मनसेचे दहा उमेदवार पराभूत झाले. नुसते पराभूत झाले नाहीतर दहाही उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झालं. पराभवामुळे खच्चलेल्या राज ठाकरे यांनी थेट मतदारांना आवाहन केलं ‘या मला तुमच्याशी बोलायचंय’ असं भावनिक आवाहन करत राज यांनी सभा आयोजित केली. मुंबईतील चुन्नाभट्टी इथं सोमय्या मैदानावर या सभेला अपेक्षेप्रमाणे विराट गर्दी झाली. राज्यभरातून मनसेच्या कार्यकर्त्यांनी या सभेला तुफान गर्दी केली होती. पराभवानंतर पहिल्यांदाच सभा घेतली आणि त्याला एवढी मोठी गर्दी झाली कुणाला वाटेल का ? ही पराभवाची सभा आहे. आत्मचिंतन करायचंय असेल तर सगळ्यांसोबत करू असं सांगत राज यांनी भाषणाला सुरुवात केली. लोकसभेच्या वादळात मनसेला ज्यांनी मतदान केलं त्यांचे धन्यवादही राज यांनी मानले.

मोदींमुळे भाजप सत्तेवर

नरेंद्र मोदी या नावाच्या करिश्मामुळेच भाजप निवडून आली. आजपर्यंत विरोधक जिंकले नाही तर सत्ताधारी हरले अशी परिस्थिती होती पण पहिल्यांदाच मोदी यांच्या लाटेमुळे भाजप सत्तेवर येऊ शकली हा जो काही विजय आहे तो फक्त आणि फक्त नरेंद्र मोदी यांचाच आहे. या विजयाबद्दल राज यांनी नरेंद्र मोदींचं अभिनंदन केलं.

लोकसभा लढवायची नव्हती पण…

लोकसभेत आमचा पराभव झाला पण आतापर्यंत कुणाचा पराभव झाला नाही. इंदिरा गांधी यांचाही पराभव झाला होता. प्रत्येक निवडणूक काही शिकवून जाते या निवडणुकीत ही मला शिकायला मिळालं. खरंतर लोकसभा लढवण्याची इच्छा नव्हती पण शेवटी पक्ष चालवावा लागतो. पक्षातील काही पदाधिकार्‍यांचंही निवडणूक लढवावी असं म्हणणं होतं. त्यातच नितीन गडकरी यांची भेट झाली. गडकरींनी निवडणूक लढू नका असा सल्ला दिला होता. पण जनतेला सामोरं कसं गेलो असतो ? या सगळ्या गोंधळामुळे लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला अशी ग्वाही राज यांनी दिली.

राहुल गांधी महात्मा गांधींचे खरे अनुयायी

नरेंद्र मोदींच्या विरोधात एकमेव उभा राहिलेला माणूस म्हणजे राहुल गांधी. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर महात्मा गांधींनी काँग्रेस बरखास्त करा अशी सूचना केली होती पण गेल्या साठवर्षात काँग्रेसच्या नेत्यांनी ऐकलं नाही, पण राहुल गांधी हे महात्मा गांधीचे खरे अनुयायी आहे ते मोदींच्या विरोधात नुसते उभेच राहिले नाही तर त्यांनी पक्ष बरखास्त करण्यास भागही पाडलं अशी बोचरी टीका राज यांनी केली.

काहीचा अर्थ ‘राज ठाकरे’ विधानसभा लढवणार

लोकसभेत पराभव झाला आता झाला पराभव…पण ज्या ठिकाणी पराभव झाला जिथे जिथे पदाधिकारी तंगड्या वर करुन पडले त्या ठिकाणी मी जातीने लक्ष्य देणार आहे. पराभव मान्य आहे यातून शिकायला मिळालं पण या विधानसभेत मुसंडी मारुन दाखवेन, ‘मला तुमच्याशी काही बोलायचंय’ असं सांगून मी, तुम्हाला इथं यासाठीच बोलावलंय, यातला जो ‘काही’ आहे त्याचा अर्थ असा की, राज ठाकरे स्वत:हा विधानसभेची निवडणूक लढणार आहे अशी घोषणा राज ठाकरे यांनी केली. तसंच विधानसभेत अपेक्षीत यश मिळाले तर नेतृत्वही करेन असं सांगून मुख्यमंत्रीपदाची इच्छा व्यक्त केली. कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, मन जिंका, मतं आपोआप मिळतील असे आदेशही त्यांनी कार्यकर्त्यांना दिले.

निवडणूक लढवणारे ठाकरे घराण्यातले राज पहिले !

महाराष्ट्राच्या राजकारणात दबदबा निर्माण करणारे ठाकरे घराणे. बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना उभी केली पण त्यांनी कधी निवडणूक
लढवली नाही. युतीची सत्ताही आली, महाराष्ट्राला मुख्यमंत्रीही दिला पण ठाकरे घराण्यातून कुणीही निवडणूक लढवली नाही. पण पहिल्यांदाच ठाकरे घराण्यातून निवडणूक लढवण्यासाठी राज ठाकरे पुढे आले आहे. राज आता आमदारकीसाठी निवडणूक लढवणार आहे पण राज ठाकरे कुठून निवडणूक लढवणार ? हे मात्र अजून गुलदस्त्यात आहे.

राज यांच्या सभेतील ठळक मुद्दे

 • जे कुणी निवडून आले ते केवळ नरेंद्र मोदींमुळेच -राज
 • विरोधी पक्ष कधी जिंकत नसतो सत्ताधारी हरत असतात
 • विरोधी पक्ष कधी जिंकत नसतो सत्ताधारी हरत असतात
 • राहुल गांधी महात्मा गांधींचे खरे अनुयायी, काँग्रेस बरखास्त करण्याचा सल्ला राहुल यांनीच मानला -राज ठाकरे
 • जे पदाधिकारी निवडणुकीत तंगड्या वर करुन पडले होते तिथे मी लक्ष्य देणार – राज
 • आलं अपयश, पण शिकायला मिळालं -राज
 • येणार्‍या विधानसभेत मुसंडी मारुन दाखवेन – राज
 • निवडणूक लढवण्याची इच्छा नव्हती पण पक्षाचा विचार आणि गडकरींच्या भेटीमुळे निवडणूक लढवली -राज
 • यापुढे मुलाखती देणार नाही -राज
 • यापुढे महाराष्ट्रात करायचंय त्याच विषयावर बोलेन
 • दोनच वर्षात नाशिकमध्ये काय केलं हे प्रश्न विचारले जातात, इतरांच्या हातात 30-30 वर्षे महापालिका देता त्यांना का नाही विचारत -राज
 • टोलचं काय झालं मला विचारलं जात पण विरोधकांना का विचारलं जात नाही – राज
 • तुम्हाला काही बोलायचं असेल तर ‘कृष्णकुंज’वर पत्र पाठवा
 • येणार्‍या विधानसभेला राज ठाकरे स्वत: निवडणूक लढवणार – राज
 • विधानसभे स्वत: हा नेतृत्व करणार – राज
 • कामाला लागा गाफील राहू नका मन जिंका मत मिळतील – राज

 

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

 • Govind Dalvi

  Baki bar Raj Sarkar …!
  Maharashtracha Man ani Abhiman Raj….eak kanakhar netrutwa

close