राष्ट्रवादीपुढे मुख्यमंत्री लाचार – खडसे

June 1, 2014 4:57 PM1 commentViews: 1640

khdse tawade and phadnavis

1 जून :   राज्य विधिमंडळाचं उद्यापासून सुरू होणारं पावसाळी अधिवेशन चांगलंच गाजणार, याची चुणूक आजच्या विरोधकांच्या पत्रकार परिषदेत दिसली. सत्ताधारी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे एकमेकांशी जमत नाही. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे कोणीच ऐकत नसून मित्रपक्षासमोर मुख्यमंत्री लाचार झालेत, अशी घणाघाती टीका विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी केली आहे.

सत्ताधारी आघाडी सरकारची कोंडी करण्यासाठी विरोधक सरसावले आहे. रविवारी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी चहापानाचा कार्यक्रम ठेवला होता. विरोधकांनी नेहमी प्रमाणे या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला. यानंतर भाजप नेते एकनाथ खडसे, विनोद तावडे, शिवसेना नेते सुभाष देसाई आणि मनसेचे बाळा नांदगावकर यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेत सरकारवर टीका केली.

राज्यात दलितांवर अत्याचार वाढलेत, खंडणीसाठी अपहरणाचे प्रकारही वाढलेत. राज्यात कायदा- सुव्यवस्था डबघाईला आली आहे, पण, गृहमंत्री फक्त आश्वासनं देतात, असं म्हणत खडसे यांनी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्यावर टीका केली.

सिंचन घोटाळ्याचा चितळे समितीचा अहवाल सरकारनं या अधिवेशनात मांडावा, अशी मागणी विरोधक करणार आहेत. त्याशिवाय महायुतीला मतं दिली म्हणून ग्रामीण भागात भारनियमन करून सरकार सूड उगवत असल्याचा गंभीर आरोपही खडसे यांनी केलाय. अधिवेशनात सरकारचं वस्त्रहरण करू, असा इशाराही त्यांनी दिला.

राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी अजित पवारांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विनोद तावडेंनी केली. मुख्यमंत्री स्वच्छ असल्याचा दिखावा करत असून ते भ्रष्टांची पाठराखणच करत आहेत. आदर्शमधील अधिकार्‍यांनी त्यांनी सेवेत का घेतले असा सवालही तावडेंनी उपस्थित केला. गारपीट ग्रस्त शेतकर्‍यांना अपुरी मदत केल्यावरही तावडेंनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. राज्य सरकार कंत्राटदारांच्या बाजूला झुकली असून या सरकारने मोदींकडून काही तरी शिकायला पाहिजे असा टोलाही तावडेंनी लगावला.

तर अजित पवार, आर.आर. पाटील व मुख्यमंत्री हे तिघे सरकारमधील खलनायक असून पराभवानंतरही आघाडी सरकारचे नेते सुधरायला तयार नाही. अजित पवार म्हणजे महाराष्ट्रावरचा कलंक आहे अशी घणाघाती टीका शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी केली. या संपूर्ण पत्रकार परिषदेत विरोधी पक्षाचे नेते राज्य सरकारवर निर्लज्ज, लाचार, कलंक अशा बोचर्‍या शब्दात टीका करत असल्याने यंदाच्या अधिवेशनात विरोधक सरकारला चांगलेच धारेवर धरतील असे दिसते.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • Pradipvasant Pawar

    virodhak recharge jhalet aata kahi khare nahi!

close