कंदाहार विमान अपहरण प्रकरणात नरेंद्र मोदींची काँग्रेसवर टीका

April 14, 2009 4:37 PM0 commentsViews: 6

14 एप्रिलकंदाहार विमान अपहरण प्रकरणात सामर्थ्यवान कोण यापेक्षा कमकुवत कोण या मुद्द्यावर भाजप आणि काँग्रेसमध्ये कलगीतुरा अजून सुरूच आहे. कंदाहार विमान अपहरण प्रकरणावरून काँग्रेसनं भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांच्यावर तोफ डागायला सुरवात केली आहे. त्यावर गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसला उत्तर दिलं आहे. काही वर्षांपूर्वी जम्मू-काश्मीरमधल्या चरार-ए-शरिफ मशिदीत अतिरेकी लपले होते. त्या अतिरेक्यांना तेव्हाचे अर्थमंत्री मनमोहन सिंग यांनी सरकारच्या पैशानं चिकन बिर्यानी खाऊ घातली होती, असा आरोप मोदींनी केलाय. लोहपुरूष अडवाणी कंदाहारमध्ये का वितळले, असा सवाल पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी काल मुंबईत ग्रॅन्ड हयातमध्ये भरलेल्या पत्रकार परिषदेत केला. त्या पत्रकार परिषदेत त्यांनी भाजपच्या आरोपांचा चांगलाच समाचार घेतला. 'अडवाणी यांच्या सरकारच्या कारकीर्दीत कंदाहार विमान अपहरणाच्या वेळी 'जैश – ए – मोहम्मद'च्या म्होरक्यांसह तिघा दहशतवाद्यांना सोडून देण्यात आलं होतं. म्हणजेच कंदाहार प्रकरणामध्ये अतिरेक्यांसमोर भाजपनं हात टेकले होते. त्यामुळे स्वत:अतिरेक्यांसमोर हार मानणा-या अडवाणींनी आघाडी सरकारवर टीका करणं हास्यास्पद आहे, असा टोला मनमोहनसिंगांनी पत्रकार परिषदेत मारला.गेली अनेक वर्षं कमकुवत पंतप्रधान अशा टीकेवर मनमोहन सिंग गप्प होते. पण काल पत्रकारपरिषदेत ज्याप्रकारे पंतप्रधान भापला सवाल करत होते त्यावरून तेही आक्रमक झाल्याचं दिसून आलं.अडवाणी आणि सोनिया गांधी यांच्यातही शाब्दिक चकमक झडली. बाहेरच्या अतिरेक्यांपेक्षा देशांतील अतिरेक्यांचा सुरक्षेला मोठा धोका असल्याचं म्हणत सोनिया गांधी यांनी भाजपवर हल्ला चढवला होता. यावर सोनियांनी माफी मागावी, अशी मागणी अडवाणींनी तिरुवनंतपुरममध्ये केली. गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनीही सोनिया गांधींवर तोफ डागली. सोनिया गांधी यांच्या विदेशी वंशाचा मुद्दा त्यांनी पुन्हा एकदा केलाय. सोनिया गांधी देशाशी एकनिष्ठ नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

close