फेसबुकवरच्या आक्षेपार्ह मजकुरामुळे पश्चिम महाराष्ट्रात तणावपूर्ण शांतता

June 1, 2014 7:39 PM1 commentViews: 20433

shop closed

1 जून :  फेसबुक या सोशल नेटवर्किंग साईटवर शनिवारी आक्षेपार्ह मजकूर अपलोड केल्याने राज्यातील काही भागांमध्ये विशेषतः पश्चिम महाराष्ट्रात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या संदर्भात तक्रार दाखल झाल्यावर फेसबुकवरुन हा आक्षेपार्ह मजकूर काढून टाकण्यात आला असला तरी यामुळे पश्चिम महाराष्ट्रात तणावपूर्ण शांतता पसरली आहे. पुण्यात संतप्त कार्यकर्त्यांनी केलेल्या तोडफोडीत १९३ बसेसचे नुकसान झाले आहे.

शनिवारी रात्री फेसबुकवर काही अज्ञात व्यक्तींनी आक्षेपार्ह फोटो अपलोड केल्याने पुणे, पिंपरी चिंचवड, बारामतीसह पश्चिम महाराष्ट्रात तणाव निर्माण झाला. या आक्षेपार्ह फोटोविषयीची माहिती झपाट्याने पसरु लागल्याने रात्री संतप्त कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये संतप्त कार्यकर्त्यांनी काही वाहने पेटवण्याचा प्रयत्न केला. तर बारामतीत रविवारी एसटी वाहतूक बंद ठेवण्यात आली. इंदापूर, दौंड मध्येही रविवारी कडकडीत बंद पाळण्यात आला. कोल्हापूर, सोलापूर, पंढरपूर या भागातही या घटनेचे पडसाद उमटले होते.

कोल्हापूरमध्ये 200 वाहनांची तोडफोड करण्यात आली. तर सोलापूरमध्ये एसटी गाड्यांना लक्ष्य करण्यात आले. पंढरपूरमध्येही दुकानांची तोडफोड करण्यात आली. सोलापूरमध्ये रविवारी खासदार शरद बनसोडे आणि आमदार विजयकुमार देशमुख यांना बेकायदेशीरपणे जमावाचे संघटन केल्याप्रकरणी ताब्यात घेण्यात आले होते. काही वेळाने त्यांची सुटका करण्यात आली. करमळ्यातही तुरळक तोडफोडीच्या घटना घडल्या आहेत.  रविवारी दुपारी मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर रास्ता रोको करण्यात आल्याने या मार्गावरील वाहतूक खोळंबली होती. दरम्यान, या सर्व भागांमध्ये पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला असून या सर्व शहरांमधील परिस्थिती नियंत्रणात आणण्यात पोलिसांना यश आले आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • Eknath More

    tya vikrut janavaracha nished yala lavakarach aatak hone garjeche aahe

close