अंजली वाघमारेंकडून काढून घेतलं कसाबचं वकीलपत्र

April 15, 2009 8:49 AM0 commentsViews: 9

15 एप्रिल मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याप्रकरणाचा एकमेव जिवंत साक्षीदार मोहम्मद अजमल कसाब याचं वकीलपत्र ऍड. अंजली वाघमारे यांच्याकडून कोर्टानं काढून घेतलं आहे. एकाच खटल्यात साक्षीदार आणि आरोपी यांचं वकीलपत्र अंजली वाघमारे यांनी स्वीकारल्यामुळे त्यांच्यावर प्रोफेशनल मिसकंडक्टचा ठपका ठेवत कोर्टानं वाघमारेंची नियुक्ती रद्द केली आहे. ऍड. अंजली वाघमारे यांच्याकडून कसाबचं वकीलपत्र काढून घेण्यात आल्याने 26/11 खटल्याच्या सुनावणीनं नाट्यमय वळण घेतलं आहे. न्यायालयाने कसाबच्या वकील म्हणून अंजली वाघमारे यांची नियुक्ती करण्याआधी त्यांनी याच प्रकरणातील पीडित आणि साक्षीदार हरिश्चंद्र श्रीवर्धनकर यांच्यावतीनं वकीलपत्र स्वीकारलं होतं. कामा रूग्णालयाजवळ कसाब आणि त्याचा साथीदार इस्माइल यांनी केलेल्या गोळीबारात हरिश्चंद्र श्रीवर्धनकर यांना गोळी लागली होती. त्यानंतर त्यांनी ऍड. वाघमारेंमार्फत नुकसानभरपाईसाठी दावा केला होता. मात्र एकाच खटल्यातले साक्षीदार आणि आरोपीचं वकीलपत्र स्वीकारणार्‍या ऍड. अंजली वाघमारे यांनी ही बाब न्यायालयापासून लपून ठेवत वकिली आचारसंहितेचा भंग केल्याची तक्रार ऍड. के.बी.एन.लामा यांनी विशेष न्यायालयासमोर केली होती. अंजली वाघमारे यांच्या वकीलपत्राविरोधात याचिका दाखल करणार्‍या ऍडव्होकेट लांब यांनी सबाउद्दीनचं वकीलपत्र घेतलं आहे. तर आपण हरिश्चंद्र श्रीवर्धनकर यांच्या वकीलपत्रावर स्वाक्षरी केली नसल्याचा दावा अंजली वाघमारे यांनी केलाय. कसाबचा खटला सहाय्यक वकील के.पी. पवार चालवण्याची शक्यता आहे.

close