बीड ते दिल्ली…गोपीनाथ मुंडेंचा जीवनप्रवास !

June 3, 2014 4:43 PM1 commentViews: 5515

03 जून : गोपीनाथ मुंडे यांचं आयुष्य संघर्षानं भरलेलं होतं. परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरी कष्ट आणि जिद्द यांच्या जोरावर त्यावर मात करून पुढे जात राहणं हा त्यांचा स्वभावधर्म होता. त्यांचा हा प्रवेश…

राजकारणात अगदी तळागाळापासून कामाला सुरुवात करुन राष्ट्रीय राजकारणात स्वतःचं नाव कमावलेल्या राज्यातल्या काही मोजक्या नेत्यांमध्ये गोपीनाथ मुंडेंचा समावेश करता येईल. त्यातही राजकारणाचा कोणताच वारसा नसताना, मराठवाड्यातल्या मागास भागात जन्म घेतलेल्या गोपीनाथ मुंडे यांनी अपार कष्टाच्या जोरावर जी काही झेप घेतली, त्याला तोड नाही. 12 डिसेंबर 1949 रोजी बीड जिल्ह्यातल्या नाथ्रा या गावामध्ये लिंबाबाई आणि पांडुरंग मुंडे या  जोडप्याच्या घरी गोपीनाथ यांचा जन्म झाला. त्यांना 2 भाऊ होते. घरची परिस्थिती बेताचीच होती. कष्टाच्या परिस्थितीतच त्यांनी शिक्षण घेतलं. अंबेजोगाईमधल्या जोगेश्वरी कॉलेजमधून त्यांनी बी.कॉमची पदवी घेतली. पदवी शिक्षण घेताना औरंगाबादमध्ये त्यांचं 1 ते दीड वर्ष वास्तव्य होतं.

 

त्यानंतर लॉ करण्यासाठी ते पुण्याला आले. तिथंच त्यांची ओळख विलासराव देशमुख यांची झाली. 2 मित्रांची ही जोडी तिथूनच जमली. शिक्षण सुरू असतानाच गोपीनाथ मुंडे यांना राजकारणात रस निर्माण झाला. दिवंगत नेते प्रमोद महाजन यांच्याशी त्यांचा स्नेह जुळला. त्यांच्यामुळेच ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे आकर्षित झाले. शिक्षण सुरू असतानाच 1971 पासून त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेबरोबर कामाला सुरुवात केली. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी 1978 मध्ये निवडणुकीच्या राजकारणात उडी घेतली. त्यावर्षी ते बीड जिल्हा परिषदेवर निवडून गेले. पुढचा प्रवास विधानसभेच्या दिशेनं सुरू झाला. 1980मध्ये रेणापूर विधानसभेवर ते निवडून गेले. यानंतर ते तब्बल 5 वेळा विधानसभेत निवडून गेले. विधानसभेत त्यांची कारकीर्द चांगलीच गाजली. विशेषतः 1992 ते 95 या कालावधीत ते विरोधी पक्षनेते असताना त्यांनी सत्ताधारी काँग्रेसला अक्षरशः सळो की पळो करून सोडले.

 

विशेषतः तेव्हा काँग्रेसमध्ये असलेल्या शरद पवार यांना त्यांनी विशेष लक्ष्य केलं होतं. यादरम्यान, एन्रॉनचा प्रकल्प अरबी समुद्रात बुडवण्याच्या आणि दाऊदला फरफटत भारतात घेऊन येण्याच्या त्यांच्या घोषणाही खूप गाजल्या. किंबहुना 1996 मध्ये युतीचं सरकार येण्यामध्ये मुं़डेंच्या झंझावाती प्रचाराचा खूप मोठा वाटा होता. पण शिवसेनेला भाजपपेक्षा जास्त जागा मिळाल्या आणि मुंडेंना मुख्यमंत्रीपदावर पाहण्याचं त्यांच्या समर्थकांचं स्वप्न अपूर्ण राहिलं. त्यांना राज्याचं गृहमंत्रीपद आणि उपमुख्यमंत्रीपदावर समाधान मानावं लागलं.

 

विधानसभेत नेत्रदीपक कामगिरी बजावल्यानंतर पक्षाने त्यांच्यावर राष्ट्रीय जबाबदारी सोपवली. प्रमोद महाजन यांच्या निधनामुळे रिकामी झालेली जागा भरून काढण्याचं कामच एकापरीनं त्यांच्यावर सोपवण्यात आलं. 2009 मध्ये ते सर्वप्रथम बीडमधून लोकसभेत निवडून गेले. 15व्या लोकसभेत त्यांच्यावर लोकसभा उपनेतेपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. नुकत्याच झालेल्या निवडणुकीतही त्यांनी राष्ट्रवादीच्या सुरेश धस यांचा पराभव करताना विक्रमी मताधिक्य मिळवलं. भाजपला बहुमत मिळाल्यानंतर गोपीनाथ मुंडे यांना महत्त्वाचं पद मिळणार हे अपेक्षित होतं. त्याप्रमाणे त्यांच्याकडे केंद्रीय ग्रामविकास खात्याची धुरा सोपवण्यात आली.आता राज्यात लवकरच होणार्‍या विधानसभा निवडणुका त्यांच्याच नेतृत्वाखाली लढवल्या जातील, असं भाजपनं जाहीर केलं होतं. पण आता तसं घडणार नाही.

लोकनेता हरपला

 • - जन्म – 12 डिसेंबर 1949
 • - जन्मगाव – नाथ्रा, बीड
 • - गोपीनाथ यांना 2 भाऊ
 • - घरची परिस्थिती बेताची
 • - जोगेश्वरी कॉलेज, अंबेजोगाई, बीकॉमची पदवी
 • - पदवीदरम्यान औरंगाबादमध्ये दीड वर्ष वास्तव्य
 • - पुण्यामध्ये कायद्याची पदवी
 • - पुण्यातच विलासराव देशमुखांचा परिचय आणि मैत्री

राजकीय वाटचाल

 • - 1971 – अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेशी संपर्क
 • - 1978 – निवडणुकीच्या राजकारणात प्रवेश
 • - 1978 – बीड जिल्हा परिषदेत विजयी
 • - 1980 – रेणापूर विधानसभेत विजयी
 • - 5 वेळा विधानसभा सदस्य
 • - 1992 ते 95 – विधानसभेत विरोधी पक्षनेते

राजकीय वाटचाल

 • - 2009 – पहिल्यांदा बीडमधून लोकसभेत
 • - 15व्या लोकसभेत उपनेतेपद
 • - 2014 – बीडमधून विक्रमी मताधिक्य
 • - 16 मे 2014 – कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ
 • - 27 मे 2014 – केंद्रीय ग्रामविकास खात्याची धुरा

दोन भाऊ

 • 1971 अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेशी संबंध
 • 1978 मध्ये जिल्हा परिषद निवडून गेले
 • 1980 रेणापूर विधानसभा
 • 2009 पहिल्यांदा लोकसभा

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

 • Anis Javed

  APNA RANGMANCH,MUMBAI,VASAI KI TARAF SE SWARGIYE GOPINATH MUNDE JI KO BHAO POORWAK SHARDHDHANJLI. ANIS JAVED

close