मेघालय : बलात्काराला विरोध केल्याने निर्घृण हत्या

June 4, 2014 7:09 PM0 commentsViews: 1442

rape04 जून : उत्तर प्रदेश पाठोपाठ आता मेघालयातले लोक एका अमानुष घटनेने हादरून गेलेत. मेघालयच्या दक्षिण गारो हिल्स जिल्ह्यामध्ये बलात्काराला विरोध करणार्‍या महिलेच्या डोक्यात गोळ्या झाडून तिला ठार करण्यात आलं आहे. गारो नॅशनल लिबरेशन आर्मीशी संबंधित अतिरेक्यांनी हे कृत्य केल्याचा अंदाज आहे.

ही पीडित महिला तिचा पती आणि पाच मुलांसह घरी असताना या दहशतवादी संघटनेचे चार-पाच अतिरेकी अचानक घरात घुसले. त्यांनी तिच्या नवर्‍याला आणि मुलांना घरामध्ये डांबून तिला घराबहेर खेचलं. तिला मारहाण करून तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण, या महिलेने विरोध करताच त्या अतिरेक्यांनी तिच्या डोक्यात तब्बल 6 गोळ्या झाडल्या, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

गारो नॅशनल लिबरेशन आर्मी ही दहशतवादी संघटना खून, अपहरण आणि खंडणीच्या अनेक घटनांमध्ये सामील आहे. दरम्यान, गारो हिल्स भागाचे खासदार आणि मेघालयचे माजी मुख्यमंत्री पी. ए. संगमा यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. गारो हिल्स भागामध्ये कायदा सुव्यवस्था दिवसेंदिवस बिघडत आहे. या आधी परिस्थिती अशी नव्हती. या समस्येवर मार्ग काढण्यात राज्य सरकार अपयशी ठरली आहे, अशी टीका संगमा यांनी केली आहे.

close