मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न अधुरेच !

June 4, 2014 7:38 PM2 commentsViews: 5022

sachin salveसचिन साळवे, असोसिएट एडिटर-वेब, आयबीएन लोकमत

भाजपचे नेते आणि केंद्रीय ग्रामविकास मंत्री गोपीनाथ मुंडे यांचे अकाली निधन झाल्यामुळे मराठवाड्यात मोठी पोकळी निर्माण झालीय. मुंडेंच्या जाण्यामुळे मराठवाड्यात आता असा मोठा ‘नेता होणे नाही’ अशीच भावना व्यक्त होतं आहे. विधानसभा तोंडावर आल्यामुळे गोपीनाथ मुंडे यांचं नाव मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत होतं. भाजपमध्ये मुख्यमंत्रीपदाच्या नावावरुन घोळ जरी सुरू असला तरी जनतेनं गोपीनाथ मुंडे यांना मुख्यमंत्री म्हणून पाहण्यास उत्सुक होती पण नियतीने हे स्वप्न पूर्ण होऊ दिलं नाही.

लोकसभा निवडणुकीच्या आखाड्यात गोपीनाथ मुंडेंनी आपला गड राखत प्रचंड मताधिक्यांनी विजयी झाले. बीडमध्ये मुंडे पराभूत व्हावे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार मोर्चेबांधणी केली होती. राष्ट्रवादीकडून सुरेश धस यांना उमेदवारी देण्यात आली होती. मुंडेंच्या पराभव व्हावा यासाठी ओबीसी समाजात मुंडेंबद्दल अपप्रचारही करण्यात आला होता. एवढंच नाहीतर बीडमध्ये मुंडेंच्या विरोधात तब्बल 18 उमेदवार रिंगणात होते पण मुंडे या सर्वांना पुरुन उरले आणि दमदार विजय मिळवला. या विजयाबद्दल मुंडेंना केंद्रीय ग्रामविकास मंत्रीपद देण्यात आलं. विशेष म्हणजे मराठवाड्यातून दिवंगत नेते विलासराव देशमुख यांच्यानंतर त्यांचेच मित्र गोपीनाथ मुंडे यांच्याकडे हे खाते सोपवण्यात आलं. ग्रामविकास खातं मिळाल्यामुळे मुंडे खूष होते. लोकसभेच्या रणसंग्रामानंतर राज्यात सर्वच पक्षांना विधानसभेचे वेध लागले. भाजपने तर निकालाच्या दिवशीच मोर्चेबांधणीला सुरुवात केली.

munde blogjpg

देशात पंतप्रधानपदासाठी ज्या पद्धतीने नरेंद्र मोदी यांचं नाव जाहीर करण्यात आलं त्याच पद्धतीने राज्यातही मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करण्यात येईल असं भाजपने स्पष्ट करुन टाकलं. पण यामुळे महायुतीच्या गोटात अस्वस्था पसरली. विधानसभेत ज्याच्या जास्त जागा तोच मुख्यमंत्रीपदी हे सरळ समीकरण तयार झालं. मात्र मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार कोण ? हा प्रश्न निर्माण झाला. लोकसभेत दणदणीत यश मिळाल्यामुळे सेना आणि भाजपमध्ये उत्साह द्विगुणा झालाय. आपल्याच पक्षाचा मुख्यमंत्री होईल यावरुन सेना आणि भाजपमध्ये रस्सीखेच सुरू झालीय. ‘देशात नरेंद्र तर राज्यात देवेंद्र’ अशा छुप्या घोषणाही सुरू झाल्या आहेत तर सेनेनंही ‘अब की बार उद्धव ठाकरे सरकार’चा नारा दिला. एव्हाना उद्धव यांनी तर मुख्यमंत्री व्हावं ही कार्याकर्त्यांची इच्छा आहे असं सांगून मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याचं जाहीर करुन टाकलं. पण महायुतीचे शिल्पकार गोपीनाथ मुंडे यांचं नावं डावललं जात होतं. याबद्दल मुंडेंनी नापसंती दर्शवली होती.

देशात नरेंद्र राज्यात देवेंद्र ही घोषणा चांगली आहे असं सांगून मुंडेंनी योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ असे संकेत दिले होते. युती सरकार जेव्हा सत्तेवर आलं तेव्हा भाजपला कमी जागा मिळाल्यामुळे गोपीनाथ मुंडेंना उपमुख्यमंत्रीपदावर समाधान मानावं लागलं होतं. प्रत्येक गोष्टीसाठी मुंडेंच्या आयुष्यात संघर्षच आला. सहजासहजी असं कोणतही पद त्यांना मिळालं नाही प्रत्येक ठिकाणी मुंडेंना लढा द्यावा लागला. आता दहा वर्षांनंतर मुख्यमंत्री होण्याचा योग्य जुळून आला होता गोपीनाथ मुंडेंचं नाव जर मुख्यमंत्रीपदासाठी जाहीर झालं असतं तर मुंडे मुख्यमंत्री झाले असते हे नाकारता येणारं नव्हतं. पण नियतीने क्रुर चेष्टा केली. मंगळवारी सकाळी गोपीनाथ मुंडेंचं अपघातात निधन झालं आणि मुख्यमंत्रीपदाचे स्वप्नही अधुरे राहिले.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • Bodkhe Adv

    My request is that IBNLOKMAT should arrange the debate on the suspected death of Shri Gopinath munde Saheb. There are thousands of questions in the mind of fans of Gopinath Munde Death. There is every possibilities of conspiracy behind the death of Gopinath Munde death. The CBI also investigating wrong side. When material evidence is available then excluding them cbi trying to confuse to the peoples. Therefore IBNLOKMAT shall arrange debate and call to Delhi police, PA Nayar, Driver, AIIMS DOCTOR, cooks, securities. and try to find out truth that is there any conspiracy behind the death of Shri. Gopinath Munde Saheb.

  • Bodkhe Adv

    Why BJP PM not saying anything on the death of Gopinath Munde?

close