गोपीनाथ मुंडेंच्या कार्याविषयी विधीमंडळ सदस्यांनी केली कृतज्ञता व्यक्त

June 6, 2014 4:57 PM0 commentsViews: 986

rajya mnatri mandal

06  जून : भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी दिलेल्या योगदानाबद्दल मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानसभेत कृतज्ञता प्रस्ताव मांडला आहे. यावेळी सर्व पक्षीय सदस्यांनी मुंडेंविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या. तर गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाताची चौकशी करण्याची राज्य सरकारनं केंद्राकडे मागणी करावी, असं शिवसेना आमदार दिवाकर रावते यांनी विधान परिषदेत मागणी केली.

स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंच्या कर्तृत्वाला सलाम करण्यासाठी शोक प्रस्तावापाठोपाठ राज्य विधीमंडळात आज कृतज्ञता प्रस्तावही मांडण्यात आला. राज्य विधी मंडळाच्या इतिहासात पहिल्यांदाच अशा पद्धतीचा कृतज्ञता प्रस्ताव मांडण्यात आला. कर्तृत्व , वक्तृत्व आणि नेतृत्वामुळे गोपीनाथ मुंडे महाराष्ट्राचे लोकनेते झाले. मैत्री आणि राजकारणात त्यांनी कधीही गल्लत केली नाही. त्यामुळे यापुढे दुसरे गोपीनाथ मुंडे होणे नाही अशी भावना विधावन सभेत सर्व वरिष्ठ नेत्यांनी व्यक्त केली. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे, छगन भुजबळ , नारायण राणे , गणपतराव देशमुख , पतंगराव कदम , सुभाष देसाई , देवंेद्र फडणवीस , बाळा नांदगावकर , हर्षवर्धन पाटील आदींची भाषणे झाली. एकनाथ खडसे आणि देवेंद्र फडणवीस यांना अश्रू आवरता आले नाहीत . तर छगन भुजबळ आणि हर्षवर्धन पाटील भाषणादरम्यान भावूक झाले.

दरम्यान, आज विधान परिषदेत ठाण्याच्या विभाजनाचा प्रस्तावही मांडण्यात आला. 15 ऑगस्ट पुर्वी विभाजन करण्याचा प्रयत्न करणार असल्याची माहिती महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे. अधिवेशन संपण्यापुर्वी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत याविषयी बैठक घेणार असल्याची माहितीही त्यांनी विधानपरीषदेत दिली. तर आदिवासी विभागात वस्तू खरेदीत झालेल्या भ्रष्टाचाराची सीआयडी चौकशी करा, असे आदेश विधानपरिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख यांनी दिले आहेत.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close