मेट्रोच्या श्रेयावरून काँग्रेस आणि भाजपमधला वाद चिघळला

June 7, 2014 8:27 PM0 commentsViews: 956

mumbai metro

07  जून :   मुंबईकरांसाठी एक खूषखबर, उद्यापासून राज्यातली पहिल्या टप्प्यातली मुंबई मेट्रो वन सर्वसामान्यांच्या सेवेत रुजू होणार आहे. उद्या दुपारी 1वाजल्या पासून मुंबईकरांसाठी मेट्रो सुरू होणार आहे. पण, त्याआधीच मुंबई मेट्रोचं श्रेयाचं राजकारण तापू लागले आहे.

मेट्रोचा प्रकल्प हा काँग्रेस सरकारनेच आणला असून आता भाजप आयते श्रेय लाटण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला आहे. आज घाटकोपर मेट्रो स्टेशनजवळ काँग्रेस आणि भाजप समर्थकांनी एकमेकांसमोर जोरदार घोषणाबाजी केली. यामुळे घाटकोपर स्टेशनवर तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं तर या आंदोलनामुळे परीसरात वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे. दरम्यान, भाजप खासदार किरीट सोमैया आणि गोपाळ शेट्टी यांना घाटकोपरला आंदोलन प्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतले होतं.

मुंबई मेट्रोच्या घाटकोपर ते वर्साेवा या टप्प्याला रेल्वे बोर्डाने काल हिरवा कंदील दिला. गेल्या तीन महिन्यांपासून ही फाईल रेल्वे बोर्डाकडे पडून होती. खासदार किरीट सोमैया यांनी केंद्रीय रेल्वे बोर्डाच्या अधिकार्‍यांना भेटुन मुंबई मेट्रो रेल्वेला आवश्यक असलेली मंजुरी मिळवली. सध्या तिकीट दर 10  रुपये ठेवण्यात आले आहे. सुरवातीचा एक महिना प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी हे दर आहेत मात्र, नंतर त्यात मोठा बदल होण्याची शक्यता आहे.

तिकीट दरावरून रिलायन्स आणि राज्य सरकार यांच्यात वाद सुरु असल्याचे पुढे येत आहे. राज्य सरकारच्या म्हणण्याप्रमाणे 9, 11, 13 रुपयांची तिकीटाची दर निश्चिती झाली आहेत तर रिलायन्सच्या म्हणण्या प्रमाणे 10, 20, 30 असा तिकीटांचा दर ठरवला आहे. दरम्यान, एनडीए उद्घाटनाची घाई करून रिलायन्सला भाववाडीत मदत करतं आहे. भाजपनं मेट्रोच्या दरवाढीसंदर्भात काय भूमिका आहे ती स्पष्ट करावी असं मुख्यमंत्र्यांनी दिलं भाजपला आव्हान दिलं आहे. तिकीट दरवाढ समितीच्या माध्यमातूनच दरवाढीविषयी विचार शक्य आहे. मनमानी पद्धतीने दरवाढ केल्यास राज्या सरकार या संर्दभात कोर्टात याचिका दाखल करलं असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. उद्या सकाळी दहा वाजता उद्घाटन करण्याचं मला आमंत्रण मिळालं आहे पण मेट्रोचे दर वाढवले तर उद्घाटनाला जाणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

मेट्रो सुरु होणार असल्याच्या घोषणेनंतरही किरीट सोमैया यांनी काँग्रेस सरकारवर टीका केली आहे. ‘काँग्रेसच्या नाकर्ते सरकारमुळेच मेट्रो इतक्या दिवस रखडली. 3 वर्षाचा प्रकल्प 10 वर्षे चालला. आता मेट्रोचे सर्व काम संपल्यानंतर व परवानग्या मिळाल्यानंतरही तिकीट दर ठरत नसल्यामुळ मुंबईकरांसाठी वेठीस धरले जात आहे. त्यामुळेच आपण स्वत शनिवारी दुपारी तीन वाजता मेट्रोचे उदघाटन करणार आहोत. सरकार आणि रिलायन्स कंपनीत तिकीट दर ठरविण्यावरून वाद सुरु आहे. सरकार मागे सरायला तयार नाही व कंपनीही त्यामुळे मेट्रो धावण्यासाठी सज्ज असूनही मुंबईकरांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे’, असं सोमैया म्हणाले.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close