सोशल मीडियातून आक्षेपार्ह पोस्ट लाईक करणार्‍यांवरही कारवाई करू – गृहमंत्री

June 9, 2014 8:45 PM0 commentsViews: 1808

rr on facebook

09  जून :  सोशल मीडियातून विघातक काम करणार्‍यांवर कारवाई करण्याची घोषणा गृहमंत्री आर आर पाटील यांनी केली आहे. फेसबुक, व्हॉट्स ऍपसारख्या सोशल नेटवर्क साईटवर आक्षेपार्ह पोस्ट टाकणार्‍या, त्याचबरोबर पोस्ट लाईक करणार्‍या किंवा फॉरवर्ड करणार्‍यांवरही यापुढे कारवाई केली जाईल, असं राज्याचे गृहमंत्री आर आर पाटील यांनी म्हटलं आहे. सायबर कायदा अधिक सक्षम करण्याची गरज असल्याचं मतही त्यांनी व्यक्त केलं आहे.

 फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट टाकण्यात आले. लगेचच पुण्यात याचे पडसाद उमटले. काही गाड्यांवर दगडफेक करण्यात आली. शहरातली शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला गेला. बघता-बघता हे लोण पंढरपूर, कोल्हापूर, उस्मानाबादपर्यंत पोचलं. या प्रकरणी अखेर राज्य सरकारला जाग आली आहे. सोशल मीडियातून विघातक कार्य करणार्‍यांवर कारवाई करणार असल्याचं आश्वासन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी दिलं आहे. पुण्याच्या खटल्यातल्या आरोपी म्हणजेच ज्याने हे आक्षेपार्ह पोस्ट फेसबुकवर टाकलं होतं त्याचा आय पी ऍड्रेस सापडला आहे आणि लवकरच आरोपीला ताब्यात घेतलं जाईल, असंही ते म्हणाले. त्याशिवाय पुण्यातल्या मोहसीन हत्या प्रकरणी हिंदू राष्ट्र सेनेवर बंदी आणण्याचा विचार सुरू आहे, असंही त्यांनी सांगितलं.

फेसबुकवर महापुरुषांची बदनामी केल्यानंतर पुण्यात सोलापूरमधल्या एका तरुणाची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात हिंदू राष्ट्र सेनेच्या 19 कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली. यातल्या 17 आरोपींना आज पुण्यातल्या लष्कर कोर्टात हजर करण्यात आलं होतं. कोर्टाने यातील सर्व 17 आरोपींना 12 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या आरोपींनी कोणत्या व्यक्तीच्या सांगण्यावरून हे कृत्य केलं याचा तपास अद्याप सुरू असल्याने आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात यावी, अशी मागणी पोलिसांकडून करण्यात आली होती. तर हिंदू राष्ट्र सेनेच्या कारवायांवर लगाम कसा घालता येईल यावर सरकारचा विचार चालू आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले.

निषेधार्थ रास्ता रोको

फेसबुकवर महापुरुषांची बदनामी केल्याचा निषेध म्हणून आज पुण्यामध्ये रास्ता रोको करण्यात आला. पुण्यामधल्या दांडेकर पुलाजवळ भारिप बहुजन महासंघानंहा रास्ता रोको आणि निदर्शनं करण्यात आली. पुण्यात काल रात्रीपासून 43 बसची तोडफोड करण्यात आली. पण सकाळपासून वातावरण शांत आहे. उस्मानाबादमध्येही काल दोन ठिकाणी तुरळक दगडफेक झाली होती. आज उस्मानाबादमध्ये बंद पाळण्यात येतोय. लातूरमध्येही मोर्चा निघाला तर औरंगाबादमध्येही आज तणाव निवळला आहे.

विद्वेषाचे पडसाद

31 मे 2014
– शनिवारी आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट प्रकरणी पुण्यात गोंधळाला सुरुवात
– अनेक ठिकाणी रास्तारोको, बस-वाहानांवर दगडफेक
– कोल्हापुरात दिडशे वाहनांचं नुकसान
– सांगली, इंचलकरंजीतही पडसाद

1 जून 2014
– दुसर्‍या दिवशीही तोडफोड, पुणे बंद
– केवळ दोन दिवसात एकट्या पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात 203 बस आणि वाहनांचीही तोडफोड
– रविवारी संध्याकाळी परिस्थिती आटोक्यात
– पंढरपूरमध्ये दुकानांवर दगडफेक
– अकलूजमध्ये बस जाळली
– सोलापुरात भाजप खासदार ताब्यात आणि सुटका

2 जून 2014
– हडपसरमध्ये बनकर कॉलनी परिसरात हिंदूराष्ट्र सेनेेच्या कार्यकर्त्यांनी गर्दी करायला सुरुवात केली.
– दुचाकीवरून फिरत कार्यकर्त्यांनी लोकांना मारहाण केली
– याच मारहाणीत मोहसीन शेख या IT तरुणाचा मृत्यू
– या प्रकरणात हिंदू राष्ट्र सेनेच्या 19 जणांना अटक
– हिंदू राष्ट्र सेनेचा संस्थापक धनंजय देसाईसुद्धा वेगळ्या प्रकरणात अटकेत

7 जून 2014
– सात जूनला फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट टाकण्यात आली.
– याचेही पडसाद उमटले. पुणे परिसरात एक बस फोडली
– औरंगाबाद, उस्मानाबादमध्ये दगडफेक झाली.
– काही बसेसचं किरकोळ नुकसान

8जून 2014
– या नव्या प्रकरणाचं लोण सांगोल्यात पोचलं.
– याच संध्याकाळी पुण्यात अनेक बस फोडल्या
– इचलकरंजी आणि सांगलीत बंद

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close