लतादीदींच्या पाठोपाठ राज ठाकरेंही कॅम्पा कोला रहिवाशांच्या बाजूने

June 10, 2014 3:58 PM0 commentsViews: 1977

campa coala

10  जून :  गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्यापाठोपाठ मनसेअध्यक्ष राज ठाकरेही कॅम्पा कोलाच्या रहिवाशांच्या समर्थनार्थ मैदानात उतरले आहेत. इमारतीचे बांधकाम सुरु असताना महापालिकेला ते बांधकाम रोखता आले नाही. मग ऐवढी वर्ष राहिल्यावर त्या घरांमधील रहिवाशांना बेघर करणे हा 100 टक्के अन्याय आहे असे राज ठाकरेंनी म्हटले आहे.

कॅम्पा कोला इमारतीतील बेकायदेशी मजल्यांवर महापालिका कारवाई करणार असून या कारवाईला विरोध वाढू लागला आहे. सोमवारी गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनीही कॅम्पा कोलाच्या रहिवाशांना ट्विटरद्वारे समर्थन दिले होते. ‘कॅम्पाकोलाच्या संदर्भात महाराष्ट्र सरकारशी मी बोलू इच्छिते. कॅम्पाकोलातील घर पाडली तर हजारो जण बेघर होतील, त्यात अनेक चिमुरड्यांचा आणि वृद्ध माणसांचाही समावेश आहे. आतापर्यंत घर पाडण्याच्या धक्क्याने तिघांचा जीव गेलाय. बिल्डरच्या चुकांची किंमत सामान्यांना मोजावी लागण हा अन्याय आहे.’ लतादिदींनी समर्थन दिल्यावर आता राज ठाकरे व भाजपचे खासदार व माजी मुंबईचे माजी पोलिस आयुक्त सत्यपाल सिंह यांनीही कॅम्पा कोलावासीयांची बाजू घेतली आहे.

एकीकडे कॅम्पा कोलाच्या रहिवाशांना पाठिंबा देणार्‍यांची संख्या वाढत असतानाच मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मात्र याविषयी सुप्रीम कोर्टाचे आदेश असल्याने आपण काहीही करु शकत नाही असे म्हटले आहे.

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा कॅम्पा कोलात ८०२  क्रमाकांचा फ्लॅट असून यामुळेच त्यांनी रहिवाशांची बाजू घेतल्याची चर्चा रंगली आहे. सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनीही लता मंगेशकर यांच्यावर टीका केली आहे. लता मंगेशकर यांनी यापूर्वी पेडर रोडप्रकरणी आवाज उठवला होता व आता कॅम्पाकोलासाठी. त्या फक्त स्वतःसाठी आवाज उठवतात अशी टीका त्यांनी केली आहे.

दरम्यान, कॅम्पा कोला येथे सध्या भितीचे वातावरण दिसून येते. बीएमसीचे अधिकारी कधीही येऊन आपल्याला घराबाहेर काढतील अशा भितीने कॅम्पा कोलातील रहिवाशांना ग्रासले आहे.  या मानसिक धक्क्यात सी.व्ही. चावला या 84  वर्षाच्या वृध्दाचा मृत्यू झाला आहे.  आम्हाला घराबाहेर काढले तर कंपाऊंडमध्ये राहूनच अंत्यसंस्कार करु असा निर्णय चावला यांची सून अंजू यांनी घेतला आहे. महापालिकेने रहिवाशांना सोमवारी रात्री घर सोडण्यासंदर्भात नोटीस बजावली आहे. पण काही झालं तरी आम्ही आमचं घर सोडणार नाही अशी भूमिका कॅम्पाकोला रहिवाश्यांनी घेतली आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close