गोपीनाथ मुंडेंच्या अपघाताची सीबीआय चौकशी होणार

June 10, 2014 12:34 PM0 commentsViews: 2345

modimunde
10  जून :   गोपीनाथ मुंडेच्या अपघाताची सीबीआय चौकशी करा ही मागणी गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी मान्य केलीय. तसे आदेशही केंद्रीय गृहमंत्रालयानं दिलेत. यासंदर्भात नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांनी राजनाथ सिंह यांची आज भेट घेतली. गोपीनाथ मुंडेंच्या अपघाताची चौकशी व्हावी अशी मागणी कार्यकर्त्यांकडून होत होती, आणि याच मागणीसाठी गोपीनाथ मुंडेंच्या अंत्यसंस्कारांनंतर जमाव आक्रमक झाला होता.

दरम्यान, माझ्या वडिलांच्या मृत्यूचं भांडवल करू नये असं आवाहन पंकजा मुंडे – पालवेंनी केलंय

त्या म्हणतात ,
माझे बाबा आदरणीय मुंडे साहेब यांच्यावर प्रेम करणाऱ्या व त्यांना गमावून सैरभैर झालेल्या लाखो लोकांना व कुटुंबाला धीर देण्याचे अतिशय कठीण शिवधनुष्य मी सध्या पेलत आहे. साहेब हयात नाहीत ही कल्पनाच या निष्पाप प्रेम करणाऱ्यांना सहन होत नाही. कृपया साहेबांच्या मृत्यूच्या चौकशीचे भांडवल करू पाहणाऱ्यांना जनतेने निर्बल करावे, त्यांना बळी पडू नये. दु:खी मनाचा आयुध म्हणून वापर करू नये. त्यांच्या मृत्यूच्या सीबीआय चौकशीबाबत प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस आणि विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांच्याशी माझे बोलणे झाले असून ते पक्षाध्यक्ष व केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह आणि पक्षश्रेष्ठींशी बोलले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर माझा पूर्ण विश्र्वास आहे. संसदेच्या पायऱ्यांवर नतमस्तक होणारा पंतप्रधान किती संवेदनशील असेल याची मला खात्री आहे. साहेबांच्या मृत्यूसंबंधातील जनमानसात असणाऱ्या आक्रोशाला ते नक्की दिशा देतील असा मला विश्वास आहे. त्यामुळे कृपया मुंडे साहेबांवर प्रेम करणाऱ्यांनी नियंत्रण सोडू नये. - पंकजा मुंडे-पालवे.

 

close