वरूण गांधी यांची पॅरोलवर सुटका

April 16, 2009 6:09 AM0 commentsViews: 1

16 एप्रिल, इटा पिलिभीत मतदार संघातले भाजपचे युवा उमेदवार वरुण गांधी यांची आज सुप्रीम कोर्टाने दोन आठवड्यांच्या पॅरोलवर सुटका केली आहे. संध्याकाळी उत्तरप्रदेशातल्या इटाह जेलमधून त्यांना सोडण्यात आलं आहे. या आनंदात भाजपच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. उत्तरप्रदेशातल्या पिलिभीतमध्ये केलेल्या वादग्रस्त भाषणामुळे वरुण गांधी अडचणीत आले होते. निवडणूक आयोगानं त्याची गंभीर दखल तर घेतलीच. शिवाय उत्तरप्रदेश सरकारनं त्यांना रासुकाही लावला. त्यामुळे गेल्या तीन आठवड्यांपासून वरुण गांधी इटाह जेलमध्ये होते. रासुकाला वरुण यांनी सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं होतं. त्यावर वरुण यांना कोर्टानं तात्पुरता दिलासा देत दोन आठवड्यांच्या पॅरोलवर सोडल्याचं वरुण गांधींचे वकील रायन करंजावाला यांनी आयबीएन लोकमतशी बोलताना सांगितलं . एकीकडे वरुण यांच्या सुटकेचं भाजपमधे स्वागतच आहे, असं भाजपचे प्रवक्ते रविशंकर प्रसाद यांचं म्हणणं आहे. तर काँग्रेसनं वरुण यांच्यावर टीका केली आहे. यापुढे प्रक्षोभक भाषण करणार नाही, असं प्रतिज्ञापत्र पुन्हा सादर करण्याचे आदेश कोर्टाने वरुण यांना दिले आहेत. सध्या पॅरोलवर सुटका झाली असली तरी वरुण यांच्या जामिनावर मात्र कोर्ट दोन आठवड्यानंतर निर्णय घेणार आहे.

close