प्रत्येक घरात पोलीस दिला तरी अत्याचार रोखणं कठीण – गृहमंत्री

June 11, 2014 2:08 PM1 commentViews: 1723

r r patil on women

11   जून :  प्रत्येक घरात पोलीस दिला तरी महिलांवरचे अत्याचार रोखता येणार नाहीत, असं खळबळजनक वक्तव्य गृहमंत्री आर आर पाटील यांनी केलं आहे. महिला अत्याचारासंदर्भात गृहमंत्र्यांनी विधान परिषदेत ही माहिती दिली. विधानपरिषदेत त्यांनी महिलांवरच्या अत्याचारासंदर्भात हतबलता व्यक्त केली आहे. आर आर पाटील यांच्या या वक्तव्यावरून मग सभागृहात मोठा गदारोळ झाला. नैतिक घसरणीमुळे या अत्याचारात वाढ झाल्याचंही त्यांनी म्हटलं. त्याचवेळी इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात कमी अत्याचार होत असल्याचंही ते म्हणाले.

6% अत्याचार हे वडील-भाऊ यांच्याकडूनच होतात तर 6% बलात्कार हे जवळच्या नातेवाईकांकडून होतात. 42% बलात्कार हे ओळखीच्या माणसांकडून होतात तर 40 टक्के बलात्कार हे लग्नाचं आमीष दाखवून केले जातात, अशी माहिती त्यांनी सभागृहात दिली. पण, अनोळखी लोकांकडून होणार्‍या बलात्काराचं प्रमाण राज्यात कमी असल्याचं त्यांनी सांगितलं.

दरम्यान, महिलांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी आणि आरोपींना लवकरात लवकर शिक्षा देण्यासाठी त्यांनी काही उपाययोजनांचीही माहिती दिली. महिलांवरचे अत्याचार रोखण्यासाठी नवी 500 वाहनं घेणार, त्याचबरोबर महिनाभराच्या आत मुंबईत 200 महिला कमांडो पथक नेमणार, सोनसाखळी चोर्‍यांचं प्रमाण कमी करण्यासाठी विशेष उपाययोजना करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. तसचं चंद्रपूर, नांदेड, भंडारा इथल्या फास्ट ट्रॅक कोर्टात न्यायाधीशांची नेमणूक करणार आणि पीडितेने जो वकील मागितला त्याचीच नेमणूक करणार असल्याचंही गृहमंत्री आर आर पाटील यांनी सांगितलं.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • Vikram

    This is not wrong statement but it is bitter truth. Laws must be stringent. for repeat offender laws should be very very stringent…

close