सिंचनाच्या चिखलात अधिकारी अडकले, अजित पवार सुटलेे !

June 14, 2014 7:17 PM0 commentsViews: 2129

5ajit_pawar_chitale_commette
14 जून : सिंचन घोटाळ्या प्रकरणी माधव चितळे समिती अहवालाचं राजकारण आता चांगलंच पेटलंय. चितळे अहवालावरचा जो कृती अहवाल सरकारने मांडलाय, तो सोयीस्कररित्या नेत्यांना क्लीन चिट देणारा आणि अधिकार्‍यांवर ठपका ठेवणारा आहे असं दिसतंय. तर सिंचन घोटाळ्याचे आरोप राजकीय हेतूनं केले जात आहे असा आरोप जलसंपदा मंत्री सुनील तटकरेंनी केला.

राज्य सरकारने चितळे समितीचा अहवाल पूर्णपणे स्वीकारला आहे. 2 वगळता सर्व शिफारसी सरकारने स्वीकारल्या आहेत असं तटकरेंनी स्पष्ट केलं. या अहवालात ज्या अधिकार्‍यांवर ठपका ठेवण्यात आलाय, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असंही तटकरे म्हणाले. राजकीय नेत्यांना सरकारने क्लीन चिट सरकारने दिली नाही, तर या अहवालातल्या शिफारसीनुसारंच क्लीन चिट दिली गेलीय असा दावा IBN लोकमतशी बोलताना तटकरेंनी केला. दरम्यान, हा अहवाल आज (शनिवारी) सरकारने विधिमंडळात सीडी स्वरुपात मांडला.

याबाबतचा कृती अहवालही आज मांडला गेला. या कृती अहवालात उपमुख्यमंत्री अजित पवारांना वाचवण्याचा प्रयत्न केला गेलाय, असा आरोप विरोधकांनी केलाय. तटकरेंनी आज विधिमंडळात सरकारची बाजू मांडली पण अहवाल मांडण्याआधीच बाजू कशी मांडता, असा सवाल विरोधकांनी केला. या अहवालात ठपका ठेवण्यात आलेल्या अधिकार्‍यांनी नार्को टेस्ट करावी असंही नमूद करण्यात आलंय या अधिकार्‍यांनी नार्को टेस्ट झालीच पाहिजे अशी मागणी विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते विनोद तावडे यांनी केली. तर आमच्या सरकारनं सिंचन क्षेत्रात क्रांतिकारी कामगिरी केलंय. 26 टक्क्यांनी सिंचन क्षेत्र वाढणं ही सोप्पी गोष्ट नाही, असा दावा वैद्यकीय शिक्षण मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केला.

सरकारने आपल्या कृती अहवालात काय निष्कर्ष मांडले ?

  • - गेल्या 9 वर्षांत सिंचन क्षमतेत 26 टक्के वाढ
  • - गेल्या 9 वर्षांत सिंचन क्षेत्रात 42 टक्के वाढ.
  • - यामध्ये प्रकल्प, कालवे, विहिरींच्या लाभक्षेत्राचा समावेश
  • - सिंचनाच्या टक्केवारीत 5.40 टक्के वाढ
  • - वाढीव किंमतीसाठी प्रकल्पांच्या अधिकार्‍यांना धरलं जबाबदार,
  • - दोषी अधिकार्‍यांवर कारवाई करणार
  • - मंत्री आणि राजकारण्यांवर कारवाईची तरतूद नाही

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close