समर्थ आणि विकसित भारतामुळे शेजारी देशांचा फायदा- मोदी

June 16, 2014 1:15 PM0 commentsViews: 1205

modi in bhutan16   जून : समर्थ आणि विकसित भारतामुळे भूतान आणि ‘सार्क’मध्यल्या अन्य देशांचा फायदा होईल असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केलं आहे. शेजारी राष्ट्रांशी उत्तम संबंधांबाबत भारत कटिबद्ध असल्याचंही मोदी म्हणाले. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दोन दिवसांच्या भूतान दौर्‍यावर गेले आहेत.आज सकाळी त्यांनी भूतानच्या संसदेत भाषण केलं. या भाषणात त्यांनी विकसित भारताचा भूतानलाही फायदा होईल असं सांगितलं. त्याचं बरोबर भारतात सत्ताबदल झाला असला तरी भारत -भूतान संबंध तसेच राहतील, असं आश्वासनही त्यांनी दिलं.

भारत आणि भूतानचे संबंध ऐतिहासिक आहेत. राजेशाहीकडून लोकशाहीपर्यंतचा भूतानचा प्रवास कौतुकास्पद असल्याचं ही ते म्हणाले. भूतानच्या अर्थसंकल्पात शिक्षणावर लक्षणीय खर्च केला जातो. भूतानमध्ये ई-लायब्ररी उभारण्यासाठी भारत प्रयत्न करेल, अशी घोषणाही त्यांनी या वेळी केली. त्याशिवाय भूतानच्या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या अधिक संधी उपलब्ध करून देणार असल्याचं आश्वासन मोदींनी दिलं. जलविद्युत प्रकल्पाच्या सहाय्यानं ग्लोबल वॉर्मिंगने ग्रासलेल्या देशांसमोर एक नवीन आदर्श मांडू, असंही ते म्हणाले.

भारत – भूतानमधली सांस्कृतिक देवाणघेवाण युवा पिढीसाठी फायदेशीर ठरेल असा विश्वासही पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलाय. काल त्यांनी भूतानचे पंतप्रधान त्शेरिंग टोब्गे यांची भेट घेतली. दोघांमध्ये द्विपक्षीय संबंधांवर चर्चा झाली. यावेळी भूतानचे राजेही उपस्थित होते. भूतानमध्ये सर्वात जास्त गुंतवणूक भारताची आहे. तिथल्या तीन जलविद्युत प्रकल्पांमध्येही भारतानं गुंतवणूक केली आहे. दरम्यान मोदींच्या हेस्ते भूतानमधल्या सुप्रीम कोर्टाच्या नव्या इमारतीचंही उद्घाटन करण्यात आलं.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close