हत्तीचा धुडगूस, माडांच्या बागा उद्‌ध्वस्त

June 16, 2014 11:46 AM0 commentsViews: 819

दिनेश केळुसकर, सिंधुदुर्ग
16   जून : सिंधुदुर्गातल्या माणगाव खोर्‍यात संध्याकाळ येते ती भीती आणि दहशत घेऊन! या भागात असलेले जंगली हत्ती आता थेट घरात घुसून शेतकर्‍यांवर हल्ला करू लागलेत. कष्ट करून उभ्या असलेल्या माड बागायती शेतकर्‍यांच्या डोळ्यांदेखत जंगली हत्तीकडून उद्‌ध्वस्त केल्या जातायत. शेतीची नासधूस केली जातेय. आता एकतर हत्तींना बाहेर काढा, नाहीतर आमचे पुनर्वसन तरी करा. पण आम्हाला जगू द्या, अशी निर्वाणीची मागणी इथल्या शेतकर्‍यांनी केली आहे.

हत्ती इलो रे…! गेल्या तेरा वर्षांपासून सिंधुदुर्गात हत्तींनी उच्छाद मांडला आहे. आता तर ही दहशत अधिकच वाढली आहे. हत्तींनी नारळाच्या बागा आणि शेतीचे अतोनात नुकसान केले आणि आता तर ते हिंसक बनतायत. एप्रिल महिन्यापर्यंत हत्तींच्या हल्ल्यात 8 जणांचे बळी गेलेत. घावनळे गावातल्या या बंद घरातली महिला विजया जाधव हत्तीच्या हल्ल्यात जायबंदी झाली. गोव्यातील बांबुळी हॉस्पिटलमध्ये सध्या ती उपचार घेत आहे. आठच दिवसांपूर्वी मुकुंद सावंत यांच्या घराची खिडकी तोडून हत्ती आत घुसला. यात सावंत यांनी कसाबसा आपला जीव वाचवला.

एका बाजूला जीवाची भीती आणि दुसर्‍या बाजूला जिवापाड कष्ट करून उभ्या केलेल्या माड बागायती असं हवालदिल जगणं सिंधुदुर्गातला शेतकरी जगत आहे.

हत्तीच्या हल्यात जखमी झाल्यामुळे कायमस्वरूपी अपंगत्व येऊन अनेक जण रोजगाराला मुकलेत. हत्तींना कर्नाटकात परत पाठवण्यासाठी सरकारने केलेल्या उपाययोजनाही अपयशी ठरल्यात. या भागात सध्या तीन हत्तींचा वावर सुरू असल्याचे शेतकरी सांगतायत.

हत्ती ज्यावेळी 2002 मध्ये कर्नाटकातून पहिल्यांदा सिंधुदुर्गात आले त्यावेळी शेतकर्‍यांनी त्यांना देव मानले. त्यांच्या पायाच्या ठशाची पूजा केली. शेतात भजने म्हटली. पण तीन पिढ्यांना पोसणारे माड ज्यावेळी उद्‌ध्वस्त व्हायला सुरुवात झाली, त्यावेळी त्यांना आपल्या समजुतीवर हसू आले आणि आता तर सरकारच्या उदासीनतेमुळे आपला वाली कुणीच नाही अशी भावना या शेतकर्‍यांची झाली आहे.

सिंधुदुर्गचे नेते राजकीय धुमाकूळ घालतात, पण हत्तींचा धुमाकूळ थांबवण्यासाठी ठोस उपाययोजना करण्यात ते अपयशी ठरलेत. सरकारी यंत्रणाही केवळ सावधानतेचा इशारा देणारे फलक लावण्यापलीकडे काही ठोस पावले टाकत नाही.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close