सिंचनचा चिखल, चुकून 28 प्रकल्पांचा खर्च वाढवला !

June 16, 2014 3:30 PM0 commentsViews: 945

आशिष जाधव,मुंबई

5chitale_report_maharashtra irrigation scam16 जून : राज्यातल्या सिंचन घोटाळ्याबद्दलचा चितळे समितीच्या अहवालावरून आता बरीच चर्चा सुरू झालीये. या अहवालात अनेक गंभीर निष्कर्ष काढण्यात आले आहेत. चुकीच्या आराखड्यामुळे एकूण 28 सिंचन प्रकल्पांचा खर्च वाढला, असंही हा अहवाल सांगतो.

राज्यातल्या सिंचन दुरावस्थेचा पंचनामाच डॉ.माधव चितळे समितीच्या अहवालात मांडला गेलाय. सिंचन प्रकल्प राबवताना राजकारणी, भ्रष्ट अधिकारी आणि ठेकेदार यांची अभद्र युतीच राज्यात कार्यरत होती असा मुख्य ठपका चितळे समितीने ठेवण्यात आलाय.

राज्यातल्या 61 प्रकल्पांची चितळे समितीने तपासणी केली. त्यातल्या 28 प्रकल्पांचं मूळ संकल्पचित्र अर्थात आराखडा बदलल्यानं त्या प्रकल्पांच्या किंमती वाढल्या असं चितळे समितीन म्हटलंय. त्यामध्ये विदर्भातले लोअर पैनगंगा, जिघाव आणि बेंबळा तापी खोर्‍यातले कुरावडोदा, मुक्ताई नगर, सुलवडे, गोदवड, लोअर तापी तर उजनीच्या खोर्‍यातले भीमा उजनी, कृष्णा कोयना उपसा सिंचन आणि सिना माडा या प्रकल्पांचा समावेश आहे. याशिवाय सुधारित प्रशासकीय मान्यता देऊन मोठ्या प्रमाणात अनियमितता करण्यात आली यामध्ये विदर्भातले 14 , खानदेशातले दोन , मराठवाड्यातले 11 प्रकल्पांचा सामवेश आहे. या प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता देतानाच मोठा घोटाळा झाल्याचं चितळेंचं म्हणणं आहे.

सिंचन प्रकल्पांच्या कामातून सरकारने ठेकेदारांच्या तुंबड्या भरल्याचं डॉ. चितळेंचं स्पष्ट मत आहे. पाच प्रकल्पांमध्ये ठेकेदारांमार्फत मोठी फसवणूक झाली आहे. पश्चिम महाराष्ट्रातला धामणी, कुकडी सिना बोगदा, विदर्भातला जिगाव प्रकल्प, रायगडमधला कोंढाणा आणि चनेरा या प्रकल्पांवर काम करणारे कंत्राटदार आणि अधिकार्‍यांची बँकखाती तपासून घोटाळ्याचा छडा लावावा अशी शिफारस चितळेंनी केलीय तर पंधरा प्रकल्पांवर अव्वाच्या सव्वा खर्च होत असल्याने त्यांचा पुनर्विचार करावा अशीही शिफारस डॉ.चितळेंनी केलीय.

गेल्या दहा वर्षात सरकारकडे सिंचनाचा कुठलाही मास्टर प्लॅन नसल्याने ठेकेदारांच्या मर्जीनुसार मनमानीपणे सिंचनाची कामं हाती घेण्यात आली. हे सत्य चितळे समितीच्या सहाशे पानी अहवालातून समोर आलंय. याला इतर कुणापेक्षा सत्ताधारी राजकारणीच जबाबदार असल्याचा ठपका चितळेंनी ठेवलाय.

अहवालातले निष्कर्ष
राज्यातल्या 61 प्रकल्पांची तपासणी
28 प्रकल्पांचं मूळ संकल्पचित्र बदलल्या
त्यामुळे प्रकल्पांच्या किंमती वाढल्या

किंमती वाढलेले प्रकल्प -
विदर्भ- लोअर पैनगंगा, जिघाव आणि बेंबळा
तापी खोरे- कुरावडोदा, मुक्ताईनगर, सुलवडे, बोधवड, लोअर तापी
उजनी खोरे- भीमा-उजनी , कृष्णा-कोयना, उपसा सिंचन आणि सीना माडा

सुधारित प्रशासकीय मान्यता देऊन अनियमितता
विदर्भ 14
खान्देश 2
मराठवाडा 11

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close