विधानसभेसाठी वाटेल ते, राष्ट्रवादीचे दबावतंत्र !

June 16, 2014 6:29 PM0 commentsViews: 1262

35pawar_cm_ncp16 जून : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दबावतंत्राला सुरुवात केलीय. गेल्या विधानसभा निवडणुकीत जिथं राष्ट्रवादीला मताधिक्य जास्त होतं, तिथं या विधानसभा निवडणुकीत जास्त जागा मागणार अशी रणनीती शरद पवार यांनी आखली आहे.

शरद पवार यांनी रविवारी राष्ट्रवादीच्या नेत्यांची मुंबईत तातडीची बैठक घेतली. मंत्र्यांसोबत झालेल्या या बैठकीत विधानसभा निवडणुकीच्या तयारीबाबत झाली चर्चा झाली. विधानसभा निवडणुकीबाबत जिल्हा पदाधिकार्‍यांची मतं जाणून घेतल्याचं शरद पवार म्हणाले.

वेळ पडल्यास जागावाटपाबाबत दिल्लीत काँग्रेसच्या वरिष्ठांसोबत चर्चाही करणार असल्याचं पवारांनी स्पष्ट केलं. तर दुसरीकडे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी गेल्या 15 वर्षांपासून आघाडीसोबत राहण्याचा निर्णय आता तोडून टाकावा आणि स्वबळावर निवडणूक लढवावी असा सूर लगावला. देशभरात काँग्रेसविरोधात लाट असल्यामुळे काँग्रेसचं लोकसभा निवडणुकीत पाणिपत झालं याचा फटका राष्ट्रवादीलाही बसला.

तसंच जनतेच्या विकासाचे निर्णय घेण्यास मुख्यमंत्र्यांना उशीर होत असल्यामुळे राष्ट्रवादीने नाराजी व्यक्त केलीय. जनतेसाठी लवकरात लवकर निर्णय घ्यावे असा आग्रहही राष्ट्रवादीने धरला आहे. विधानसभेला सामोरं जाण्यासाठी पवारांनी दबावतंत्राला सुरुवात करुन काँग्रेसला कात्रीत पकडण्याचा प्रयत्न सुरू केलाय.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close