आयपीएलची विजयी ओपनिंग कोण करणार ?

April 18, 2009 6:32 AM0 commentsViews: 6

18 एप्रिल, केपटाऊन जिच्या अस्तित्वाविषयी साधारणपणे महिन्याभरापूर्वी रणकंदन माजलं होतं त्याच त्या आयपीएल म्हणजे इंडियन प्रिमिअर लिगच्या टी-20 सामन्यांना आजपासून दक्षिण अफ्रिकेत सुरुवात होत आहे. अर्थात हे साध्य झालंय ते आयपीएलच्या चालकांच्या हट्टामुळे आणि मालकांच्या जिद्दीमुळे. कोटींचे मानधनं, कोटींचे प्रक्षेपण हक्क,कोटींचा संरक्षण विमा असे चिक्कार कोटींचे डाव आजपासून आयपीएलमुळे दक्षिण आफ्रिकेत रंगणार आहेत.आयपीएलच्या दुसर्‍या हंगामाची सुरुवातही दिमाखात झाली. गुरुवारचा उद्घाटन सोहळा बघताना टी-20 क्रिकेटला विरोध करणार्‍या लोकांची बोटंही तोंडात गेली असतील. ऐनवेळी परदेशात हलवण्यात आलेल्या टी-20चा दुसरा हंगाम हा पहिल्या हंगामा इतकाच लक्षवेधी होणारेय आणि तोही सातासमुद्रापलीकडे याची ती जणू नांदीच होती. आयपीएलचा दुसरा हंगाम आता काही तासांवरच येऊन ठेपला आहे. आयपीएलच्या आजच्या पहिल्या दिवशी मुंबई इंडियन्स विरूद्ध चेन्नई सुपरकिंग्ज आणि बंगळुरू रॉयलचॅलेंजर्स विरूद्ध राजस्थान रॉयल्समध्ये सामने रंगणार आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची मुंबई इंडियन्स यंदा विजेतेपदाच्या अपेक्षेनंच मैदानात उतरली आहे. पण त्याचबरोबर गेल्यावर्षी केलेल्या चुका पुन्हा होऊ नयेत याची काळजी टीमला घ्यावी लागणार आहे. चेन्नई सुपर किंग्सची काम्गिरी आयपीएलच्या पहिल्या हंगामात खरोखरच सुंदर झाली होती. विशेष म्हणजे कर्णधार महेंद्रसिंग धोणीच्या यशाचा धडाका यंदाच्या मोसमातही कायम राहिला आहे. त्याच्या कर्णधारपदाखाली भारताच्या टीमनं जबरदस्त कामगिरी केली आहे. त्यामुळे आयपीएमध्येही हीच कामगिरी करण्यास धोणी उत्सुक असणारेय.आयपीएलच्या पहिल्या वहिल्या हंगामात राजस्थान रॉयल्स टीमने विजेतेपद पटकावलं. पण व्यस्त आंतरराष्ट्रीय कार्यक्रमामुळे टीमचे महत्त्वाचे काही खेळाडू या हंगामात खेळत नाहीयेत. त्यामुळे टीमचा कर्णधार शेन वॉर्न मात्र त्यामुळे वैतागला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट कार्यक्रमात आयपीएलला स्वतंत्र स्थान मिळावं आणि त्यादरम्यान आंतरराष्ट्रीय मॅच खेळवण्यात येऊ नयेत, अशी मागणी आता त्याने केलीये. बंगळुरू रॉयल्स चॅलेंजर्स टीमला आयपीएलचा पहिला हंगाम विसरून जायलाच आवडेल. गेल्यावर्षी त्यांची टीम टेस्ट टीम म्हणून हिणवली गेली.खुद्‌द मालक विजय माल्या यांनी मीडियाशी बोलताना कामगिरीचं खापर कॅप्टन राहुल द्रविडवर फोडलं.सुरुवातीपासूनच सगळं बिनसत गेलं आणि आयपीएल जिंकण्याच्या इराद्याने मैदानात उतरलेली टीम शेवटच्या क्रमांकावर फेकली गेली. पण यावर्षी टीमने नवी सुरुवात केली आहे. केविन पीटरसनच्या समावेशामुळे बॅटिंगही सुधारली आहे. त्यामुळे आजची आयपीएलची विजयी ओपनिंग कोण करणारेय याकडे लक्ष लागून राहिलं आहे.

close