अजित पवारांच्या काळात बिनकामाचे सिंचन 34 पटीने वाढले !

June 18, 2014 10:45 PM0 commentsViews: 1555

आशिष जाधव,मुंबई

18 जून : उपमुख्यमंत्री अजित पवार हे राज्याचे सलग 7 वर्ष जलसंपदा मंत्री होते. त्यांच्या काळात सर्वाधिक सिंचन क्षमता वाढल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस करतेय. पण प्रत्यक्षात मात्र अजित पवारांच्या काळात बिनकामाचे सिंचन 34 पटीने वाढल्याचा चितळे समितीच्या अहवालातून उघड झालंय.

एखाद्या प्रकल्पाचे काम पूर्ण होऊनही जर शेतकर्‍यांच्या शेतापर्यंत सिंचनाचं पाणी पोहचत नसेल,तर त्याला अनुपयुक्त म्हणजेच बिन कामाचं सिंचन म्हटलं जातं. डॉ.माधव चितळेंच्या अहवालात अजित पवारांच्या बिनकामाच्या सिंचनती पोलखोलच करण्यात आलीय. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारमध्ये 2003 पासून ते 2010 पर्यंत सलग 7 वर्ष अजित पवार जलसंपदा मंत्री होते. त्यांनी सिंचन प्रकल्पांच्या कामांना मोठी गती दिल्याचा दावा नेहमीच केला जातो.

चितळे समितीच्या अहवालानुसार,2001 मध्ये राज्याची सिंचन क्षमता 36 लाख 48 हजार हेक्टर इतकी होती. त्यावेळी सिंचनाच्या दृष्टीने बिनकामाची सिंचन क्षमता केवळ 7 हजार 500 हेक्टर होती. पुढे 10 वर्षात राज्याची एकूण सिंचनक्षमता 9 लाख 42 हजार हेक्टरने वाढवून ती 45 लाख 90 हजार हेक्टर इतकी झाली. पण त्यात बिनकामाच्या सिंचनाची भरमसाठ वाढ होऊन ती 2 लाख 31 हजार हेक्टरपर्यंत पोहचली.ही वाढ थोडीथोडकी नसून , 2001 च्या तुलनेत 34 पट जास्त होती. मात्र त्याचवेळी एकूण सिंचन क्षमता केवळ पाव पटीने वाढली. या 10 वर्षातले सुरवातीची पद्मसिंह पाटलांची 2 वर्ष सोडली तर उर्वरित काळ जलसंपदा खातं अजित पवारांच्या ताब्यात होतं.

एकूणच काय,सर्वसामान्य शेतकर्‍यांसाठी सिंचनाची सोय निर्माण केल्याचा दिंडोरा पिटत जलसंपदा खात्यानं प्रत्यक्षात मात्र ठेकेदारांच्या तुंबड्या भरल्या,हेच खरं !

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close