मुख्यमंत्री बदलाच्या हालचालींना वेग, शिंदेंचं नाव आघाडीवर -सूत्र

June 19, 2014 8:26 PM0 commentsViews: 2650

565cm_maharashtra19 जून : लोकसभा निवडणुकीत सपाटून पराभवाला सामोरं गेलेल्या काँग्रेसने विधानसभेसाठी सावध पवित्रा घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री बदलाचं तळ्यातमळ्यात सुरू होतं आता मात्र त्यावर चर्चा सुरू झालीय. दिल्ली दरबारी मुख्यमंत्री बदलाबाबत चर्चा झाली. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना पुन्हा दिल्लीत पाठवण्यात येणार असल्याचं कळतंय. त्यांच्या जागी मुख्यमंत्री म्हणून माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचं नाव आघाडीवर असल्याचं समजतंय.

त्याचबरोबर राधाकृष्ण विखे पाटील आणि थोरात यांच्या नावावरही चर्चा झाली. मात्र राष्ट्रवादीचा कल हा शिंदे यांच्याकडे असल्याचं कळतंय. दिल्लीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, ए. के. अँटोनी आणि अहमद पटेल यांच्यामध्ये महाराष्ट्रातल्या नेतृत्व बदलाबाबत चर्चा झाली. विशेष म्हणजे काही दिवसांपासून राष्ट्रवादीने उघड उघड पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यशैलीवर नाराजी व्यक्त केली होती.

अलीकडेच झालेल्या राष्ट्रवादीच्या बैठकीतही चव्हाण जनतेच्या हिताचे निर्णय घेत नसल्याची पवारांनी नाराजी व्यक्त केली होती. बुधवारी शरद पवार आणि चव्हाण यांच्या रात्री बंद दाराआड चर्चाही झाली होती. त्यामुळे राष्ट्रवादीने दबावंतत्राचा वापर करुन चव्हाणांना दिल्ली दरबारी पाठवण्याची तयारी केलीय.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close