फिल्म रिव्ह्यु : तुझी माझी लव्हस्टोरी

June 21, 2014 3:50 PM0 commentsViews: 2794

अमोल परचुरे, समीक्षक

‘तुझी माझी लव्हस्टोरी…’अनपेक्षितपणे सुखद धक्का बसावा तसं हा सिनेमा बघितल्यावर वाटतं. सिनेमाची सुरुवात होते, टायटल्स दिसायला लागतात, समुद्राच्या लाटा उलट्या मागे जाताना दिसतात, हिरव्यागार निसर्गाचं लोभसवाणं रुप दिसतं आणि हा काहीतरी वेगळा प्रकार आहे असं वाटायला लागतं. नावातच लव्हस्टोरी असल्यामुळे कथेचा अंदाज आधीपासून केलेला असतो, पण त्यातही अंदाज चुकायला लागतो आणि मग आपण थोडे सावरुन बसतो. कथेचं वेगळेपण, सिनेमाचा फ्रेश लूक यामुळे सिनेमा आवडायला लागतो. पण इंटरव्हलनंतर सिनेमा सुंदर दिसत असला तरी कथा तीच नेहमीची वळणं घ्यायला लागते, आणि एक वेगळा सिनेमा बनता बनता राहिला याचं राहून राहून वाईट वाटतं

. गेल्या काही वर्षात दक्षिणेतील सिनेमांमध्ये लव्हस्टोरीचा वेगळा विचार होताना दिसत होता. तिथले अनेक सिनेमे सुपरहिटही झाले. ‘तुझी माझी लव्हस्टोरी’ बघून दक्षिणेतील सिनेमांमध्ये असलेल्या टेकिंगची आठवण होते, पण यश मिळवण्यासाठी किंवा प्रेक्षकांचा पाठिंबा मिळवण्यासाठी पटकथेवर आणखी मेहनत होण्याची गरज आहे, तसंच लव्हस्टोरी असेल तर त्यात संगीताची जादूही असायला पाहिजे जी या सिनेमात जाणवत नाही, पण तरीही पारंपरिक पद्धतीने काम न करता वेगळा प्रयत्न केल्याबद्दल ऋषीकेश मोरे आणि टीमचं अभिनंदन आणि कौतुक करायलाच पाहिजे.

काय आहे स्टोरी ?

tujhi majhi love story marathi movieही लव्हस्टोरी आहे इंद्रनील आणि आदितीची..इंद्रनील हा जेजे आर्ट्स मध्ये शिकलेला..मनाने कलाकार असल्यामुळे त्याला कलेतच रमायचं आहे. या अशा स्वच्छंदी इंद्रनीलला भेटते आदिती, जी त्याच्या मोठ्या बहिणीची मैत्रीण आहे. पहिल्याच नजरेत तो आदितीच्या प्रेमात पडतो, पण हे प्रेम एकतर्फीच असतं, मग आपलं प्रेम मिळवण्यासाठी त्याला काय काय खटपटी-लटपटी करायला लागतात, ते सिनेमात बघायला मिळेल. इंटरव्हलआधी कथेमध्ये चांगले चढउतार आहेत. प्रेक्षकांसाठी काही धक्के आहेत त्यामुळे सिनेमात रंगत टिकून राहिलेली आहे. पण इंटरव्हलनंतर मी आधी म्हटल्याप्रमाणे नावीन्याचा थोडा अभाव आहे. वेगळ्या वाटेनं जाणार्‍या कथेचं पुढे काय करायचं याबद्दल गोंधळ झाल्यामुळे असेल कदाचित, पण शेवटाकडे जाताना सिनेमा खूपच सरधोपट मार्गाने जायला लागतो, जिकडे प्रेक्षकाचा इंटरेस्टही संपत आलेला असतो.

परफॉर्मन्स

f14tujhi majhi love story marathi movie

सामान्यत: मराठी सिनेमात खूप संवाद असतात, पण या सिनेमात तसं नाहीये. मोजके संवाद आहेत, रोजच्या बोलण्यातले संवाद आहेत, त्यामुळे ती एक महत्तवाची गोष्ट म्हणायला पाहिजे. इंद्रनील आणि आदितीच्या या लव्हेबल स्टोरीमध्ये चांगल्या संगीताची कमतरता जाणवते. बॉलीवूडमधल्या बापी-टुटुलचं संगीत असलं तरी गाण्यांचा काहीही प्रभाव पडत नाही, गाणी लक्षातही राहत नाहीत. सुपरहिट गाणी असती तर सिनेमासुद्धा आणखी यशस्वी ठरू शकला असता. अभिनयाबद्दल बोलायचं तर गौरव घाटणेकर या नव्या चेहर्‍याने चांगलीच छाप पाडलीये. आणखी थोडी मेहनत घेतली तर तो एक चांगला हिरो म्हणून नावारुपाला येऊ शकतो. श्रुती मराठेनेही काम चांगलं केलंय. इंद्रनीलच्या मित्राच्या भूमिकेत संकेत मोरेनेसुद्धा संजस काम केलंय, पण तो इंद्रनीलपेक्षा वयाने खूप लहान वाटतो.

रेटिंग 100 पैकी 50 !

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close