मुंडे कुटुंबीयाच्या विरोधात उमेदवार देणार नाही -पवार

June 21, 2014 9:53 PM0 commentsViews: 4586

4sharad_pawar21 जून : बीड मतदारसंघातून पोटनिवडणुकीसाठी मुंडे कुटुंबातून उमेदवार दिल्यास राष्ट्रवादी उमेदवार देणार नाही, उमेदवार न देऊन हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केलं.

भाजपचे ज्येष्ठ दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांची आज सर्वपक्षीय शोकसभा मुंबईत झाली. यावेळी सर्व पक्षांच्या नेत्यांनी मुंडेंना आदरांजली वाहिली. या शोकसभेत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या इतर नेत्यांनी मुंडेंच्या आठवणींना उजाळा दिला.

यावेळी पवारांनी मुंडे यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला. गोपीनाथ मुंडे आणि घड्याळ असं कधी जमलं नाही. मुंडे आणि आमच्यात कधी पटलं नाही. ते एका टोकाला होते आणि आम्ही दुसर्‍या टोकाला होता. त्यांनी संघर्ष यात्रा काढून आमचं सरकारही पाडलं पण त्यांच्या सारखा सामाजिक आणि लोकांची जाण असणार लोकनेता पुन्हा होणे नाही.

त्यांची कारकीर्द वाखण्यांना जोगी होती. त्याकाळी भाजपमध्ये वसंतराव भागवत आणि प्रमोद महाजन या दोघांशी माझे घनिष्ठ संबंध होते. त्यावेळी वसंतराव म्हणाले होते, या (गोपीनाथ मुंडे यांच्यावर) व्यक्तीवर लक्ष ठेवा, उद्याच्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अत्यंत महत्वाची कामगिरी करणारा हा व्यक्ती असून निवडणुकीत हार जीत तर आलीच पण समाजातील सर्व समुदयाच्या माणसांना एकत्रित घेऊन एक सामाजिक ऐक्याला प्रोत्साहन देणारा असा हा नेता होणार आहे असं ते म्हणाले होते. वसंतरावांनी दिलेला शब्द नंतरच्या काळात आम्हाला प्रखरपणे जाणावला अशा भावना पवारांनी व्यक्त केल्या. तर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे मुंडेंना हक्कानं गोपीनाथ असं हाक मारायचे आणि गोपीनाथ मुंडेंनीही बाळासाहेबांचा शब्द कधी टाळला नाही, असं उद्धव ठाकरे ठाकरे म्हणाले.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close