ज्येष्ठ कम्युनिस्ट नेत्या अहिल्याताई रांगणेकर यांचं निधन

April 20, 2009 12:20 PM0 commentsViews: 6

20 एप्रिल, मुंबई ज्येष्ठ कम्युनिस्ट नेत्या आणि माजी खासदार अहिल्याताई रांगणेकर यांचं काल सकाळी साडे सहा वाजता त्यांच्या मुंबईतल्या राहत्या घरी हृदयविकारानं निधन झालं. त्या 86 वर्षांच्या होत्या. त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी एक वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. 1943 मध्ये शिक्षण पूर्ण केल्यानंतर अहिल्याताईंनी स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला. सुधारणावादी कुटुंबात जन्मलेल्या अहिल्याताईंना घरच्यांकडून पूर्ण पाठिंबा होता. त्यांचे मोठे भाऊ बी.टी.रणदिवे यांचा त्यांच्यावर मोठा प्रभाव होता. स्वातंत्र्य चळवळ जोरात असताना त्यातला महिलांचा सहभाग वाढला पाहिजे हे लक्षात घेतअहिल्याताई रांगणेकरांनी परळ महिला संघाची सुरुवात केली. यात बहुतेक सगळ्या कामगार वर्गातल्या महिला होत्या. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतही त्यांचं मोठं योगदान होतं.1961मध्ये त्यांनी पहिल्यांदाच कम्युनिस्ट पार्टीच्या तिकिटावर निवडणूक लढवली. 1977मध्ये उत्तरमध्य मुंबईतून त्या माकपच्या खासदार म्हणून निवडून आल्या होत्या. महागाई प्रतिकार महिला समितीच्या माध्यमातून त्यांनी लाटणे मोर्चा काढून महागाईकडे सरकारचं लक्ष वेधलं. महागाईच्या मुद्यावरून त्यांनी त्या काळच्या मंत्र्यांना सळो की पळो करून सोडलं. स्त्रीमुक्ती चळवळीतही अहिल्याताई यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीच्या पॉलिट ब्युरोच्याही अहिल्याताई सदस्य होत्या. पाणी, निवारा हक्क आणि रेशनिंग या मुद्यांवर त्यांनी आयुष्यभर लढा दिला.

close