किचन बजेट कोलमडणार, सिलेंडर 5 रुपयांनी महागणार ?

June 24, 2014 9:45 PM0 commentsViews: 965

cylinder price hike24 जून : मोदी सरकार स्थापन होऊन महिना झाला नाही तेच मोदी सरकारने रेल्वेच्या भाड्यात वाढ करून सर्वसामान्यांना धक्का दिला. या धक्क्यातून अजून सर्वसामान्य सावरला नाही पण मोदी सरकार इंधनाचे दर वाढवण्याच्या तयारी असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. घरगुती सिलेंडरच्या किमतीत पाच रुपयांची वाढ होऊ शकते. तर केरोसीनच्या दरात 1 रुपयाने वाढ होण्याची शक्यता आहे.

ही भाववाढ प्रत्येक महिन्यात 5 रुपयांनी होणार असल्याचं कळतंय. याच प्रमाणे केरोसीनच्या किमती दर महिन्यात 50 पैसे ते 1 रुपये प्रति लिटर भाववाढ करण्याचा प्रस्ताव सरकारने आखला आहे. सध्या सरकार सिलेंडर आणि केरोसीनवर 80 हजार कोटी सबसिडी देत आहे. ही सबसिडी कमी करण्यासाठी भाववाढ करण्याचा विचार सरकारने केला आहे.

14.2 किलोच्या सिलेंडरवर सरकार 432.71 रुपे सबसिडी देते. जर 5 रुपये प्रत्येक महिने वाढ केली तर ही सबसिडी संपवण्यासाठी 7 वर्ष लागतील. सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार घटक पक्षांनी यावर होकार दिला तर हीच भाववाढ 10 रुपये प्रति महिना होऊ शकते. तर केरोसीनवर 32.87 रुपये प्रति लिटर सबसिडी आहे जर केंद्र सरकारने केरोसीनवर एक रुपये प्रति महिने भाव वाढ केली तर अडीच वर्षात ही सबसिडी पूर्ण होईल.

मात्र, इंधनाच्या किंमतीविषयी या आठवड्याच्या शेवटी परिस्थिती स्पष्ट होईल, असं सरकारी सूत्रांकडून समजतंय. यासंबंधी पंतप्रधान, अर्थमंत्री आणि तेलमंत्री यांच्यात चर्चा झाली होती. याच्या संदर्भात या आठवडयात अजूनही उच्चस्तरीय बैठका होणार आहेत. इंधनाच्या किंमतींविषयी रंगराजन फॉर्म्युलाचाही पंतप्रधान मोदी आणि अर्थमंत्री जेटली आढावा घेणार आहेत.

रंगराजन यांनी नैसर्गिक वायुंची किंमत प्रति युनिट दुप्पट करण्याचा सल्ला दिलाय. सूत्रांच्या माहितीनुसार, तेल मंत्रालय यासंदर्भात एक कॅबिनेट नोट तयार करत आहे. गॅसदराविषयी स्थिती येत्या दोन दिवसांत स्पष्ट होईल. या दरांविषयी पंतप्रधान आणि अर्थमंत्र्यांनी अजून आपला निर्णय तेल मंत्रालयाला कळवलेला नाही. मात्र या निर्णयामुळे पक्षांतर्गतच विरोध होण्याची चिन्ह आहे. एनडीएतल्या घटक पक्षांकडूनही या निर्णयाला विरोध होऊ शकतो. रेल्वेच्या भाडेवाढीवर अगोदरच शिवसेनेनं विरोध दर्शवला होता. भाडेवाढीमुळे अगोदरच सरकारला जनतेच्या रोषाला सामोरं जाव लागत आहे. त्यामुळे सरकार दरवाढ करते का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close