माणिकराव ठाकरेंचं प्रदेशाध्यक्षपद जाण्याची शक्यता

June 26, 2014 1:56 PM0 commentsViews: 1368

56manikrao_Thakare26 जून : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीने प्रदेशाध्यक्षपदी फेरबदल केल्यामुळे आता काँग्रेसने प्रदेशाध्यक्ष बदलण्यासाठी हालचाल सुरू केलीय. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची खुर्ची शाबूत राहिली असली तरी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांना हटवण्यावर काँग्रेसमध्ये दिल्लीत चर्चा सुरू आहे.

माणिकराव ठाकरे यांच्या जागी महिलेची नियुक्ती करण्याच्या विचारात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आहेत. 28 जूनला होणार्‍या समिक्षा समितीच्या बैठकीनंतर माणिकराव ठाकरे यांच्या उचलबांगडीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

प्रदेशाध्यक्षपदासाठी राज्यसभा सदस्य रजनी पाटील, कृषीमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व ज्येष्ठ काँग्रेस नेते शिवाजीराव मोघे यांच्या नावांची चर्चा आहे. देशात सद्यस्थितीत एकाही राज्यात महिला प्रदेशाध्यक्ष नाही.

राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसने सुप्रिया सुळे यांना पुढे आणले आहे. राज्यात असलेली महिला नेतृत्त्वाची पोकळी सुप्रिया यांनी भरून काढल्यास काँग्रेसला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे रजनी पाटील यांना प्रदेशाध्यक्ष करण्यावर पक्षश्रेष्ठींचा जोर आहे. प्रदेशाध्यक्ष बदल्यावर सरकार आणि पक्षात समन्वय निर्माण होईल असा दावा काँग्रेस नेते करीत आहेत.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close