राज्यावर पाणीकपातीचं संकट; पुण्यात एक वेळा पाणीपुरवठा

June 26, 2014 7:04 PM0 commentsViews: 916

drought_in_maharashtra26 जून : वरुणराजे रुसल्यामुळे महाराष्ट्रावर पाणीबाणीचे संकट घोंघावत आहे. मान्सून वेळेवर दाखल झाला पण अचानक ‘गेला मान्सून कुणीकडे’ अशी शोधाशोध सुरू झाली. मृगाच्या पावसाने थोडीफार हजेरी लावून दिलासा दिला खरा पण अचानक पावसाने पाठ फिरवल्यामुळे बळीराजा हवालदिल झालाय. बळीराजा हवालदिल तर झालायच पण शहरात पाणीकपातीचं संकट दाराशी येऊन ठेपलंय.

कमी पावसाचा फटका पुणेकरांनाही बसणार आहे. पुण्यात आजपासून दोनवेळा ऐवजी एक वेळच पाणीपुरवठा होणार आहे. 8 ऑगस्टपर्यंत ही पाणीकपात लागू राहील. त्यानंतर जुलैच्या पावसाचा अंदाज घेऊन फेरविचाराविषयी निर्णय घेतला जाईल. पुण्यातल्या चारही धरणांमधल्या पाण्याचा साठा कमी झाल्याने पुण्यात पाणी कपात करावी लागेल अशी माहिती पुण्याच्या महापौर चंचला कोद्रे यांनी दिली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाणीकपातीचे संकेत दिले आहे. वर्षभर पुरेल इतकं पाणी आपण ठेवलंय, पण यंदा पाऊस कमी असल्यामुळे 25 जूनपर्यंत पाऊस नाही पडला तर महापालिकेला कठोर निर्णय घ्यावा लागेल अशी माहिती अजित पवारांनी दोन दिवसापूर्वीच दिली होती.

नाशिकमध्ये 25 टक्के पाणीकपात

तर नाशिक शहरात 25 टक्के पाणीकपात करावी अशा सूचना जिल्हाधिकार्‍यांनी महापालिकेला केल्या आहेत. गंगापूर धरणात पुरेसा पाणीसाठा नसल्याने पाणीकपातीचा निर्णय घेण्यात आला आहे. मान्सूनची परिस्थिती अधिक बिकट झाली तर येत्या काळासाठी पाण्याची अधिक गरज भासेल. त्याचा विचार करून जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतलाय. तर मनमाडमध्ये 10 दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. वाघदर्डी धरणातलं पाणी संपलंय. हा पाणीसाठा आता केवळ 5 जुलैपर्यंत पुरेल इतकाच पाणीसाठा आता धरणात उपलब्ध आहे. त्यामुळे पालखेड धरणातून पाणी सोडण्याची मागणी करण्यात येतेय.

अंबरनाथमध्ये टँकरने पाणीपुरवढा

तर हीच परिस्थितीत मुंबईकरांवरही ओढावलीय. चिखलोली धरणाच्या पाण्यानं तळ गाठलाय. दररोज या धरणातून 6 दशलक्ष लीटर पाण्याचा पुरवठा केला जातो. आता मात्र धरणात 2 दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे अंबरनाथ पालिका जीवन प्राधिकरणाच्या मदतीनं टँकरनं पाणीपुरवठा करतेय.

बळीराजाची नजर आकाशाकडे

राज्यात पावसानं ओढ दिल्यानं ग्रामीण महाराष्ट्रात शेतकरी हवालदिल झालाय. एल निनोच्या प्रभावामुळे पावसाची नक्षत्र वाया गेली त्यामुळे विहिरीतल्या पाण्यानं तळ गाठलाय शेतातली उभी पिकं पाण्याअभावी करपू लागली आहेत. त्यामुळे बळीराजाचे डोळे आकाशाकडे लागले आहेत.

कुरूल पंचक्रोशीतील ऊसउत्पादक शेतकरी दुष्काळातून बाहेर पडल्यानंतर पांडूरंग वाघमोडे यांनी बँकेतून कर्ज काढून ऊस लागवड केली. उन्हाळ्यात पोटच्यापोराप्रमाणे सांभाळलेला त्याचा ऊस आता ऐन पावसाळ्यात पाण्यावाचून जळून चाललाय. विहिरीतल्या पाण्यान तळ गाठलाय तर आकाश कोरड पडलंय. त्यामुळे डोक्यावर कर्जाचा डोंगर,शेतातलं उभं पिक जळताना बघून दाद कुणाकडे मागायची याची भ्रांत पडलीय.

हीच परिस्थिती सोलापूर जिल्ह्यातल्या गावा-गावात पहायली मिळत आहे. कुणी हातपंपावर पाणी बैलगाडीतून दररोज वाहून नेत आहे. तर कुणी उचक्या मारणार्‍या बोअर पाईप हाती घेवून पाण्याची प्रतिक्षा करतोय. काळी माती अशी आ वासून पावसाची प्रतिक्षा करत आहे. अन हतबल शेतकरी राना-वनात अशा येरझर्‍या मारत आहे. शेतकर्‍याच्या हक्काची नक्षत्र यावर्षी बरसलीच नाहीत एल निनोच्या प्रभावामुळे केवळ दोन टक्के क्षेत्रावर खरीपाच्या पेरण्या झाल्या मात्र आता पाऊसच न आल्यान हंगाम वाया गेलाय.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close