एलबीटीबाबत मुख्यमंत्र्यांची भूमिका मवाळ

June 27, 2014 6:23 PM0 commentsViews: 1156

cm on lbt27 जून : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारने घोषणाचा धडाका लावलाय. त्यातच गेल्या कित्येक दिवसांपासून एलबीटीच्या मुद्यावर आता राज्य सरकारने नरमाईची भूमिका घेतली. महापालिकेनं जकात हटवायला विरोध केलाय लवकरच सर्व महापालिकांसाठी नव्या पर्यायी कराचा प्रस्ताव वित्त विभागाकडून आणला जाणार असून त्यानुसार लवकरच निर्णय घेतला जाईल असं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केलं. आयबीएन लोकमतला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षण, एलबीटीबद्दल आपली भूमिका स्पष्ट केली.

मुख्यमंत्री सध्या रिलॅक्स पण…

राज्यात नेतृत्त्व बदल होणार, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची खुर्ची धोक्यात असल्याची चर्चा चांगलीच गाजली पण काँग्रेस हायकमांडने अभय दिल्यामुळे मुख्यमंत्र्यांची खुर्ची तुर्तास वाचली. त्यामुळे मुख्यमंत्री सध्या रिलॅक्स आहे. माझं मुख्यमंत्रीपद जाणार की नाही याबद्दल सध्यातरी काही सांगू शकत नाही अशी बोलकी प्रतिक्रिया खुद्ध मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी देऊन उद्या काय होऊ शकतं याबद्दल अंदाज व्यक्त केलाय.

लोकसभा निवडणुकीत दारुण पराभवानंतर काँग्रेसमध्ये मतभेद चव्हाट्यावर आले. ‘मुख्यमंत्री बदला’ असा नाराच काँग्रेसच्या नेत्यांनी दिला. पण यावरही मुख्यमंत्र्यांनी दिल्लीवारी करुन हायकमांडकडून अभय मिळवला. पण त्यानंतरही मुख्यमंत्र्यांवर टांगती तलवार कायम राहिली. आघाडीचा मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी विधानसभेच्या पाऊल खुणा ओळखत मुख्यमंत्री बदलाची मागणी काँग्रेस हायकमांडपुढे मांडली होती. काँग्रेसनेही यावर विचार केला पण याहीही वेळी मुख्यमंत्र्यांनी हायकमांडची मर्जी राखण्यात यश मिळवलं. मुख्यमंत्र्यांनी आपली खुर्ची वाचवण्यात यश मिळवलं.

राज्यात परतल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी कामाचा धडाका लावला. गेल्या कित्येक वर्षांपासून रखडलेल्या मराठा आरक्षणाचा प्रश्न आचारसंहिता संपताच मार्गी लावला. मराठा आरक्षणासोबत मुस्लीम समाजालाही 5 टक्के आरक्षण देण्याचा निर्णयही घेतला. एवढेच नाहीतर ठाणे मेट्रो, एलबीटी आदी विषयही हाती घेतले आहे. त्यापैकी ठाणे मेट्रोला मान्यताही देण्यात आली. तर एलबीटीचा मुद्दाही लवकरच सुटेल असे संकेत चव्हाणांनी दिले. आता उद्या शनिवारी दिल्लीत काँग्रेस हायकमांडची महत्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हजर असणार आहे. लोकसभेत राज्यात काँग्रेसला फक्त दोन जागा मिळू शकल्यात. या पराभवाची कारणीमिमांसा या बैठकीत केली जाणार आहे. त्यामुळे या पराभवाचे खापर कुणावर फोडले जाणार हे महत्वाचे ठरणार आहे. हायकमांड याबद्दल काय निर्णय घेणार हे उद्याच्या बैठकीनंतरच स्पष्ट होईल.

‘आघाडीत सर्व काही नीट चाललंय’

शरद पवारांनी आघाडीचं नेतृत्त्व स्वीकारावं असा कुठलाही प्रस्ताव काँग्रेसनं दिलेला नाही, असा माझा समज आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये मतभेद नाहीत. मराठा आरक्षणाचा प्रश्न दोन्ही पक्षांनी एकमताने घेतला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीबरोबर जुळवून घेण्यात कसलीही अडचण नाही. गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही सोबत आहोत. आताही सर्व काही नीट चाललेलं आहे असंही मुख्यमंत्री म्हणाले.

कोर्टात आरक्षणाचा मुद्या टिकेल

आत्तापर्यंत लोकांच्या हिताचेच निर्णय घेतले आहेत. मात्र धोरणात्मक निर्णय घेताना वेळ लागतो. प्रक्रिया पूर्ण करावी लागते. शंकांचे पूर्ण समाधान झाल्यावरच निर्णय घ्यावे लागतात. मराठा आरक्षणाला आव्हान देणार्‍या जनहित याचिकेला आव्हान देणारी याचिका हायकोर्टात दाखल झाली आहे. कोर्टात या निर्णयाला आव्हान दिलं जाईल हे माहिती होतंच. त्यामुळे पूर्ण विचारांनीच निर्णय घेतलाय. आरक्षणाचा प्रश्न कोर्टात टिकेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close