दिल्लीत काँग्रेसची बैठक ; मुख्यमंत्र्यांचं काय होणार?

June 28, 2014 12:49 PM0 commentsViews: 735

565cm_maharashtra28 जून : काँग्रेसच्या महाराष्ट्रात झालेल्या पराभवाचं विश्लेषण करण्यासाठी अँटनी समिती राज्यातल्या काँग्रेस नेत्यांशी नवी दिल्लीत चर्चा करणार आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे आणि मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष जनार्दन चांदूरकर ए.के. अँटनी यांची भेट घेणार आहे. दिल्लीतल्या 25, गुरुद्वारा रकाबगंज रोड या काँग्रेसच्या वॉर रुममध्ये ही बैठक होणार आहे. सध्या राज्यात काँग्रेसमध्ये नेतृत्वबदलाच्याही चर्चा सुरू आहेत. दरम्यान, आयबीएन लोकमतला दिलेल्या खास मुलाखतीत माझं मुख्यमंत्रीपद जाणार की नाही याबद्दल सध्यातरी काही सांगू शकत नाही अशी बोलकी प्रतिक्रिया मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी देऊन उद्या काय होऊ शकतं याबद्दल शंका व्यक्त केली होती.

लोकसभा निवडणुकीत दारुण पराभवानंतर काँग्रेसमध्ये मतभेद चव्हाट्यावर आले. ‘मुख्यमंत्री बदला’ असा नाराच काँग्रेसच्या नेत्यांनी दिला. पण यावरही मुख्यमंत्र्यांनी दिल्लीवारी करुन हायकमांडकडून अभय मिळवला. पण त्यानंतरही मुख्यमंत्र्यांवर टांगती तलवार कायम राहिली. आघाडीचा मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी विधानसभेच्या पाऊल खुणा ओळखत मुख्यमंत्री बदलाची मागणी काँग्रेस हायकमांडपुढे मांडली होती. काँग्रेसनेही यावर विचार केला पण याहीही वेळी मुख्यमंत्र्यांनी हायकमांडची मर्जी राखण्यात यश मिळवलं.

मुख्यमंत्र्यांनी आपली खुर्ची वाचवण्यात यश मिळवलं. राज्यात परतल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी कामाचा धडाका लावला. गेल्या कित्येक वर्षांपासून रखडलेल्या मराठा आरक्षणाचा प्रश्न आचारसंहिता संपताच मार्गी लावला. मराठा आरक्षणासोबत मुस्लीम समाजालाही 5 टक्के आरक्षण देण्याचा निर्णयही घेतला. एवढेच नाहीतर ठाणे मेट्रो, एलबीटी आदी विषयही हाती घेतले आहे.

त्यापैकी ठाणे मेट्रोला मान्यताही देण्यात आली. तर एलबीटीचा मुद्दाही लवकरच सुटेल असे संकेत चव्हाणांनी दिले. आता उद्या शनिवारी दिल्लीत काँग्रेस हायकमांडची महत्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हजर असणार आहे. लोकसभेत राज्यात काँग्रेसला फक्त दोन जागा मिळू शकल्यात. या पराभवाची कारणीमिमांसा या बैठकीत केली जाणार आहे. त्यामुळे या पराभवाचे खापर कुणावर फोडले जाणार हे महत्वाचे ठरणार आहे. या बैठकीनंतर याबाबत काही निर्णय होतो का, याबाबत उत्सुकता आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close