जयललितांचा शरद पवारांना पाठिंबा

April 21, 2009 1:16 PM0 commentsViews: 1

21 एप्रिलनवीन पटनायकांपाठोपाठ आता जयललितांनीही पवारांना पाठिंबा व्यक्त केला आहे. हे पाहता पवारांचं पंतप्रधानांचं निवासस्थान सात रेसकोर्स रोडच्या दिशेनं पाऊल टाकत आहे. लोकसभेच्या निवडणुकांचा पहिला टप्पा पार पडला. 23 एप्रिलला गुरुवारी दुसर्‍या टप्प्याचं मतदान होत आहे. कोणाचं सरकार येणार याचं उत्तर अजूनही कोणाकडेच नाहीये. पण आधी बिजू जनतादलाचे नवीन पटनायक आणि आता अण्णाद्रम्रुकच्या जयललिता यांनी पवारांना दिलेला पाठिंबा पाहता अनिश्चित वातावरणातही पंतप्रधानपदासाठी शरद पवारांच्या समर्थकांमध्ये वाढ होत आहे. शरद पवार हे आमचे पंतप्रधानपदाचे उमेदवार आहेत असं दोन महिन्यांपूर्वी राष्ट्रवादीने जाहीर केलं आणि तो लोकांच्या चेष्टामस्करीचा विषय ठरला. जेमतेम एक डझन खासदारांचा पाठींबा असणारा माणूस, पंतप्रधान कसा असेल, असं म्हणून कित्येकांनी त्यांची खिल्लीही उडवली. पवारांनीही एक पाऊल मागे घेतल्याचं दाखवलं. मात्र वातावरण बदलताना दिसतंय. पवार पंतप्रधान होण्यास पात्र आहेत, असं म्हणणार्‍यांच्या यादीत आता अण्णा द्रमुकच्या नेत्या जयललिताही सामील झाल्या आहेत. या आधीही आयबीएन नेटवर्कला दिलेल्या विशेष मुलाखतीत बिजू जनता दलाच्या नवीन पटनायकांनीही पवारांच्या नावाला पाठिंबा दिलाय. लोकसभेच्या 21 जागा असलेल्या ओरिसात सध्या बीजू जनता दलाला निम्म्यापेक्षा जास्त जागा मिळण्याची शक्यता आहे. तसंच 39 जागा असलेल्या तामिळनाडूत जयललितांची स्थिती सध्या भक्कम आहे. या दोन्ही पक्षांच्या सुस्थितीचा फायदा पवारांना होऊ शकतो. समाजवादी पक्षाची पवार पंतप्रधान होण्यास काहीच हरकत नाहीये. डाव्या पक्षांशी पवारांचे चांगले संबंध आहेतच. महत्त्वाचं म्हणजे पवारांचे काँग्रेसशीही बरे संबंध आहेत. त्यामुळे खासदार कमी असले तरी 'सर्वमान्यता' हा निकष लावला, तर पवारांचं पंतप्रधान होण्याचं स्वप्न यावेळी पूर्ण होऊ शकतं.

close