एक व्हिलन : एक फसलेला थ्रिलर !

June 28, 2014 11:05 AM0 commentsViews: 4538

अमोल परचुरे, समीक्षक

Ek-Villain-Movie‘आशिकी 2′ सारखा रोमॅटिक सिनेमा दिग्दर्शित केल्यानंतर मोहित सुरी आपल्या मूळ पदावर आला आणि त्याने बनवला एक व्हिलन… रोमँटिक थ्रिलर बनवण्यासाठीच मोहित सुरी ओळखला जातो, त्यामुळे एक व्हिलनकडून चांगल्याच अपेक्षा निर्माण झाल्या होत्या. अनोख्या स्टारकास्टमुळे उत्सुकतेत आणखी भर पडली होती.

श्रद्धा कपूर, सिध्दार्थ मल्होत्रा आणि रितेश देशमुख असा त्रिकोण आणि जोडीला आमना शरीफ, कमाल आर खान आणि रेमो..कलाकारांच्या या भट्टीतून काहीतरी वेगळं बघायला मिळेल अशी अपेक्षा होती, पण नवीन बाटलीत जुनाच मसाला असंच या एक व्हिलनचं वर्णन करता येईल.

एकतर हा सिनेमा 2010 साली आलेल्या एका कोरीयन सिनेमाची सहीसही नक्कल आहे, म्हणजे हा ऑफिशियल रिमेक नाही तर उचलेगिरी आहे. बरं, मूळ सिनेमातल्या चांगल्या गोष्टी न घेता मूळ सिनेमाला टिपिकल बॉलीवूड मसाला सिनेमाचा लेप देण्यात आलेला आहे. सिनेमातील जमून आलेली गोष्ट म्हणजे रितेश देशमुखचा जबरदस्त अभिनय.. नाचसारख्या सिनेमानंतर तो गंभीर भूमिकांकडे फारसा वळलाच नाही, पण आता रितेश देशमुखला स्टार न म्हणता अष्टपैलू अभिनेता म्हणावं लागेल, एवढं त्याने जबरदस्त काम केलंय.

काय आहे स्टोरी ?

f466ek villain

आयेशा, गुरू आणि राकेश… तिघांची ही गोष्ट आहे… आता यात व्हीलन नेमकं कोण आहे ते सिनेमा बघितल्यावर तुमच्या लक्षात येईलच… पण मूळ सिनेमात दाखवल्याप्रमाणे, गुरू आणि राकेश या दोन्ही व्यक्तिरेखांना खलनायकी रंग आहेत. कोणताही माणूस पूर्णपणे खलनायक असत नाही, हेच दाखवण्याचा प्रयत्न सिनेमात जागोजागी करण्यात आलाय. मुंबईत काही वर्षांपूर्वी एका सायको थ्रिलरने थैमान घातलं होतं. हॅमरमॅन नावाचा हा सायको रात्री-अपरात्री माणसांना हातोड्याने मारायचा, या एक व्हिलनमध्ये रितेश देशमुखने अशीच भूमिका केली.ek_villan (1)

हातोड्याच्या जागी स्क्रू ड्रायव्हर आलाय एवढाच काय तो फरक..पण सगळी कथा रचताना अनेक ठिकाणी जो भोंगळपणा आहे.त्यामुळेच सिनेमा फसलाय. कन्सेप्ट खूप चांगली आहे, पण त्या कन्सेप्टवर सिनेमा बनवताना फार मेहनत घेतलेली नाही. ओरिजिनल सिनेमा हाताशी असतानाही त्यापासून फारसा बोध घेतलेला नाहीये. मेंटल हॉस्पिटलमधून रुग्णांना किडनॅप करुन त्यांची लग्नं लावण्यासारखे प्रकार टाळायलाच हवे होते. श्रद्धा कपूरला कोणतातरी असाध्य आजार झालाय, पण शेवटपर्यंत तिच्या चेहर्‍यावर आजाराची कोणतीही चिन्हं दिसत नाहीत, अशा बर्‍याच चुका आणि अनावश्यक गोष्टींमुळे सिनेमातला थ्रिलरच निघून गेलेला आहे.

परफॉर्मन्स

या एक व्हिलनमध्ये रेमो फर्नांडिस गोव्यातील एका माफियाच्या रोलमध्ये आहे. रेमोला अभिनयाची फारशी संधी नाहीये, पण जेव्हा जेव्हा तो बोलतो तेव्हा त्याचा ऍक्सेंट ऐकून कंपनीमधल्या मोहनलालची आठवण येते. कमाल आर खान तर प्रचंड कॉमेडी पद्धतीने स्वत:चे डायलॉग्ज बोलतो, त्यामुळे त्याचं प्रत्येक बोलणं कॉमेडीच वाटत राहतं. त्याच्याबरोबरच्या सीनमध्ये रितेश कसा काय एवढा गंभीर राहू शकला याचंच आश्चर्य वाटतं. सिद्धार्थ मल्होत्राच्या अभिनयात अजूनही कोणतीही सुधारणा झालेली नाही.

vek villain ritesh deshmukhतो नुसताच रफटफ दिसतो, अँग्री यंग मॅन भासतो, पण इंटेसिटीमध्ये तो खूपच कमी पडतो. श्रद्धा कपूरने ‘आशिकी 2′ मध्ये खूपच चांगला अभिनय केला होता, पण एक व्हिलनमध्ये तिची स्टाईलच पूर्णपणे चुकलीये असं वाटत राहतं. अर्बन आणि चुलबुली मुलीचा रोल परिणितीला शोभून दिसतो, पण तिच्यासारखाच अभिनय करण्याचा मोह श्रद्धा कपूरला चांगलाच भोवलाय. एकतर तारसप्तकात किंचाळणं ऐकवत नाही, आणि फास्ट बोलणं तिला सूट होत नाही. या सगळ्यांपेक्षा रितेश देशमुख खूपच उजवा आहे, आपण इथे सिनियर आहोत हेच त्याने दाखवून दिलंय. सिनेमा बघून बाहेर पडताना लक्षात राहतो तो केवळ रितेश देशमुख आणि तेरी गलिया हे गाणं..एकंदरित, फार अपेक्षा ठेवून गेलात तर तुमची निराशा होऊ शकते एवढंच शेवटी सांगतो.

रेटिंग 100 पैकी 50
 

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close