‘पदार्पणात मोदींचं त्रिशतक’, लालकृष्ण अडवाणींनी केली नरेंद्र मोदींची स्तुती

June 29, 2014 7:23 PM0 commentsViews: 2704

modi advani
29  जून :  भाजपचे जेष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी आज नरेंद्र मादींचं भरभरून कौतुक करत त्यांची तुलना चक्क क्रिकेटपटूंशी केली आहे. नरेंद्र मोदी लोकसभा मोहिमेचे कप्तान बनले आणि पहिल्या कसोटीतच त्यांनी त्रिशतक ठोकलं असं सांगत अडवाणींनी मोदींची स्तुती केली. हरियाणातल्या सूरजकुंड इथे भाजपच्या नवनिर्वाचित खासदारांसाठी आयोजित करण्यात आलेल्या प्रशिक्षण शिबिराचा आज समारोप झाला. या शिबिराच्या समारोप कार्यक्रमात लालकृष्ण अडवाणी यांनी खासदारांना मार्गदर्शन करताना नरेंद्र मोदी यांची स्तुती केली.

कोणत्याही पक्षाने बहुमतावर सत्ता स्थापन करण्याची ही गेल्या 30 वर्षांमधली पहिली घटना आहे. विरोधी पक्षनेतेपद मिळवण्यासाठीदेखील माजी सत्ताधार्‍यांना आता संघर्ष करावा लागतोय हे यापूर्वी कधीच घडलं नव्हतं. पक्षाच्या विजयाचं श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदींना जातं असे गौरवोद्गार त्यांनी काढलेत. टेस्ट क्रिकेटमध्ये पहिल्याच सामन्यात शतक झळकावणारे अनेक बॅट्समन पहिले पण त्रिशतक ठोकणारा बॅट्समन पहिल्यांदाचं पाहिला असं ते म्हणाले. पहिल्यांदाच निवडणुकीला उभं राहून 160 खासदार संसदेत निवडून आलेत ही अभिमानाची बाब असल्याचंही त्यांनी सांगितलं.

या शिबिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवनिर्वाचित खासदारांना मार्गदर्शन केलं. त्यांनी कर्तव्याबद्दल प्रामाणिक राहण्याचा सल्ला खासदारांना दिला आहे. संसदेमध्ये आणि संसदेच्या बाहेरही खासदारांच्या वागण्याकडे मतदारांचं लक्ष असतं असा इशारा मोदींनी खासदारांना दिला आहे. आज पियुष गोयल आणि प्रकाश जावडेकर सोशल मीडियासंदर्भात या खासदारांना मार्गदर्शन केलं.

दरम्यान, या शिबिरात संघ नेते सुरेश सोनी यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यांनी लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्याचा दिवस अर्थात 16 मेची तुलना भारताला स्वातंत्र्य मिळाल्याच्या दिवसाशी केली आहे. 1947 मध्ये ब्रिटिशांनी भारत सोडताना जी भावना देशवासियांमध्ये होती तशीच भावना लोकसभेमध्ये भाजपला बहुमत मिळाल्यावर लोकांमध्ये होती असं ते म्हणालेत.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close