राणे, अंतुलेंची साक्ष नोंदवा : सबाउद्दीनच्या वकिलांची मागणी

April 22, 2009 10:58 AM0 commentsViews: 7

22 एप्रिल, मुंबई नारायण राणे आणि बॅरिस्टर ए.आर.अंतुले या महाराष्ट्रातील दोन मोठ्या नेत्यांची साक्ष नोंदवणं आवश्यक असल्याचा मुद्दा सबाउद्दीनचे वकील एजाज नकवी यांनी आर्थर रोड जेलच्या स्पेशल कोर्टात उपस्थित केला. हा मुद्दा उपस्थित करताना मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याबाबत माजी महसूल मंत्री आणि सध्याचे उद्योगमंत्री नारायण राणे तसंच अल्पसंख्यांक खात्याचे केंद्रीय मंत्री बॅरिस्टर ए.आर.अंतुले यांनी केलेल्या वक्तव्यांची दखल घेतली जावी असंही एजाज नकवी म्हणाले. 26/11 च्या खटल्याच्या सुनावणीचा आजचा सातवा दिवस होता. शहीद हेमंत करकरे यांना दहशतवाद्यांनी नाही तर अन्य कुणी मारलं असल्याची शक्यता ए.आर. अंतुले यांनी व्यक्त केली होती तर मुंबईवर झालेल्या हल्ल्याला राज्यातील काहींनी अंतर्गत मदत केल्याचा आरोप नारायण राणे यांनी केला होता. त्या दोघांच्या या वक्तव्यांची आठवण एजाज अहमद यांनी आज कोर्टाला करून दिली. त्यावेळी या दोघांना कोर्टात बोलावून हल्ल्याच्या संदर्भातली माहिती नीट जाणून घ्यायला हवी, असंही वकील एजाज अहमद म्हणाले. पण नारायण राणे आणि अंतुलेंना कोर्टात बोलावण्याची ही वेळ नसल्याचं कोर्टानं सांगितल्याचं विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी सांगितलं. गरज पडली तर जरूर बोलावू पण सध्या नाही, असंही उज्ज्वल निकम म्हणाले.

close