पेट्रोल 1.69 तर डिझेल 50 पैशांनी महागले

June 30, 2014 8:21 PM0 commentsViews: 766

petrol_price_hike30 जून : ‘अच्छे दिन’ असं गोड आश्वासन देणार्‍या मोदी सरकारने सर्वसामान्य जनतेला आणखी एक झटका दिलाय. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्यात आलीय. पेट्रोल प्रतीलिटर 1.69 रूपयाने महाग तर डिझेल प्रतीलिटर 50 पैशांनी महागणार आहे. ही दरवाढ आज मध्यरात्रीपासून लागू होणार आहे.

सर्वसामान्याचा जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या पेट्रोल डिझेलच्या दरात मोदी सरकारने पहिल्यांदाच वाढ केलीय. दरवाढीचा निर्णय हा इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने घेतलाय. इराकमध्ये आराजक परिस्थिती निर्माण झाल्यामुळे जगभरावर इंधन दरवाढीचं संकट घोंघावत होतं. त्यामुळे इंधनाच्या दरात वाढ होणार हे जवळपास निश्चित होतं. अखेर आज पेट्रोलियम कंपन्यांनी दरवाढीचा निर्णय घेतला.

काही दिवसांपूर्वी मोदी सरकारने रेल्वे भाडेवाढीत 14.2 टक्क्यांनी वाढ केली. मोदी सरकार सत्तेवर आल्यामुळे ‘अच्छे दिन’ येतील अशी अपेक्षा सर्वसामान्यांना होती मात्र दरवाढीची कुर्‍हाड कोसळल्यामुळे सर्वसामान्यांमध्ये सरकारविरोधात तीव्र असंतोष पसरला आहे.

विशेष म्हणजे बजेट सादर होण्याअगोदरच ही दरवाढ करण्यात आलीय. त्यामुळे बजेट कसं असणार यावरुन स्पष्ट संकेत मिळत आहे. या दरवाढीवर काँग्रेसने मोदी सरकारवर निशाणा साधलाय. हेच मोदी सरकारचे अच्छे दिन आहे अशी बोचरी टीका काँग्रेस नेते मनिष तिवारी यांनी केलीय.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close