जेलमध्ये गुंडाचा ‘हॅपी बॅर्थ डे’, आमदाराने नेला केक ?

July 1, 2014 7:06 PM0 commentsViews: 6243

01 जुलै : गेल्या काही दिवसांपासून गुंडांच्या हैदोसामुळे देशाची उपराजधानी नागपूर काळवंडली गेलीय. आता तर कारागृहातच कुख्यात गुंड संतोष आंबेकरचा वाढदिवस साजरा झाल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय. 26 जून रोजी आंबेकरचा वाढदिवस होता. कारागृहात वाढदिवस तर साजरा केलाच पण या गुंडाच्या वाढदिवसाला भाजपचे आमदार विकास कुंभारे हे जेलमध्ये केक घेऊन गेले होते अशीही माहिती मिळतेय. यासोबतच जेलच्या समोरील रस्त्यावर फटाके फोडण्यात आले.

पण, मी जेलमध्ये गेलो नाही. मी आंबेकरसाठी केक नेला होता हे जर सिद्ध झालं, तर कुठलीही शिक्षा भोगायला तयार आहे अशी प्रतिक्रिया IBN लोकमतशी बोलताना कुंभारेंनी दिली. शहरात एका बिल्डरला भर पोलीस ठाण्यात धमकावल्या प्रकरणी आंबेकर सध्या नागपूरच्या सेंट्रल जेलमध्ये शिक्षा भोगत आहे.

दरम्यान, या प्रकरणाचा अहवाल नागपूर पोलिसांनी तयार केला असून तो राज्याच्या तुरुंग महानिरिक्षक मीरा बोरवणकर यांना पाठवण्यात आला आहे. या अहवालात आमदार विकास कुंभारे हे त्यावेळी सेंट्रल जेलमध्ये हजर होते हे नोंदवण्यात आले आहे. सुत्रांनी आयबीएन लोकमतला दिलेल्या माहितीत संतोष आंबेकरला जामीन मिळूनही याच प्रकरणात नागपूर पोलिसांनी त्याचा प्रॉडक्शन रिमांड मागितला आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close