मोदीसाहेब, तुम्ही सुद्धा?

July 3, 2014 12:34 PM4 commentsViews: 3712

dipti_raut_ibn_lokmat_nashik

- दीप्ती राऊत , ब्युरो चीफ,IBN लोकमत

मा.पंतप्रधान मोदीसाहेब,

कांदा उत्पादक शेतकर्‍याचा प्रणाम.

आमच्या कांद्यानं तुमच्या सरकारच्या डोळ्यात पाणी आणू नये यासाठी आपण ‘कठोर’ निर्णय घेत असल्याचं कळलं.
पण, तुमच्या या ‘कठोर’ निर्णयानं आमच्या जीवाचं मात्र पाणी व्हायची वेळ आलीय.
खूप ऐकलं होतं, साहेब तुमच्या गुजरातबद्दल. गुजराती व्यापार्‍यांबद्दल, गुजराती शेतकर्‍यांबद्दल आणि गुजराती माणसांबद्दल… जन्मजात उद्योगशीलता जपण्याची गुजराती माणसाची वृत्ती, व्यवहारी दृष्टीकोन आणि सतत प्रगतीचा कास…
म्हणूनच साहेब, आम्ही आमचे मत तुमच्या पारड्यात घातले. म्हटलं, शेतकर्‍यांचे राजे म्हणणवणार्‍यांनी आमचं काही भलं केलं नाही, तुम्ही आमचा नक्की विचार कराल. सुधारित शेती, प्रगतीशील शेती, शेतीमालाला बाजारभाव, शेतीमालाची निर्यात… काय काय स्वप्नं पाहिली होती आम्ही पण…
पण कसचं काय… काल सकाळी तुमच्या सरकारनं आमच्या कांद्यावरचं निर्यातमूल्य वाढवलं आणि संध्याकाळी त्याचा जीवनावश्यक वस्तूत समावेश करण्याचा विचार व्यक्त केलात… आणि आमच्या काळजाचं पाणी पाणी झालं…

narendra modi

साहेब, आमची अडीच एकर शेती बघा. पाण्याचा पत्ता नाही. पाऊस बेभरवशाचा. कांदा आमची रोजी आणि कांदा आमची रोटी. वर्षातून तीनदा घ्यायचा. तीसवेळा त्याला हात लावायचा. खरीपाची दोन पिकं तर आल्या भावाला विकायची. उन्हाळ्यातला रांगडा गडी तेवढा आमचा आधार. त्यातून हाती उरणार्‍या दोन पैशांवर पुढलं वर्ष अवलंबून. खरीपाचं बियाणं, खतं, औषधं, पोरीचं शिक्षण, पोराचं लग्न, म्हातार्‍याचं आजारपण… पूर्वी या उन्हाळ कांद्याचा फायदा व्यापार्‍यांना व्हायचा. भरपूर कांदा बाजारात आला की भाव पडायचे, व्यापार्‍यांची चांदी आणि शेतकर्‍यांचा वांदा. व्यापार्‍याची खळंी भरायची आणि भाव चढला की त्याचं सोनं व्हायचं. राज्य सरकारनं कांदा चाळ योजना आणली आणि माझ्यासारखा कोरडवाहू छोटा शेतकरी कांदा शेतावरच साठवू लागला. बाजारातला भाव बघून, गरज पडेल तसा कांदा चाळीतून काढून बाजारात आणू लागला. भाव कमी असेल तेव्हा धीर धरू लागला. साहेब, तुमच्या गुजराती भाषेत यालाच व्यापारी वृत्ती म्हणतात ना? भाव पडले की तुम्ही शहरी लोकं म्हणे शेअर्स खरेदी करता आणि भाव वधारले की विकता ना? साहेब पण तुम्ही करता तो ‘स्टॉक’ आणि आम्ही करतो ती ‘साठेबाजी’ कशी? आता कांद्यासारखं नाशीवंत पीक साहेब, गाडग्यामडक्यात तर लपवता येत नाही ना… 30 क्विंटल कांदा चाळीत भरला तर 5 क्विंटल सडून जातो. 3 क्विंटल वजनात घटतो. साठेबाजांवर कारवाई करा, कारवाई करा असं तुम्ही दिल्लीकर म्हणता तेव्हा आमचंच आम्हाला हसायला येतं. आता व्यापारी साठेबाजी करता म्हणता… गेलं ते सरकार म्हणायचं आणि तुमचंही सरकार म्हणतं… पण मागच्या सरकारचं व्यापारी ऐकत नव्हते… तुमचे आणि व्यापार्‍यांचे तर चांगले उद्यमशील संबंध… तेव्हा तुम्हालाच माहीत साहेब, आमच्याकडून 15 रुपयानं खरेदी केलेला कांदा दिल्लीत पोहोचेपर्यंत 40 रुपयांचा नेमका कसा होतो ते.. तेवढं जरा शोधून काढा… नाहीतर आग सोमेश्वरी आणि बंब रामेश्वरी… मागच्या पानावरून पुढे सुरू…

article-2397337-1B5EFF06000005DC-502_634x332

तुम्ही म्हणे परदेशी गुंतवणूकदारांना प्रोत्साहन देताय… परदेशी चलन भारतात खेळलं तर देशाचा विकास होईल म्हणताय… आमच्या कांद्यानं तर मोप परदेशी चलन आणलं होतं साहेब आपल्या देशासाठी. त्याला तुम्ही मागे खेचताय. बाकीच्यांच्या निर्यातीला प्रोत्साहन आणि कांद्याच्या निर्यातीवर बंधनं हे कसं काय?
बरं आधी देशातल्या लोकांना पुरवू आणि मग निर्यात करू असं म्हणाल, तर साहेब, लक्षात घ्या आपल्याकडं जेवढा कांदा पिकतो त्यातला फक्त 10 टक्के कांदा निर्यात होतो. तुमच्या आधीचं सरकार पण असंच करायचं. गडगंज पगार घेणार्‍या शहरी मतदारांना खूश करण्यासाठी आमच्या कांद्याचं निर्यात मूल्य वाढवून त्याच्या निर्यातीवर बंधन आणायचं, पण त्यातून भाव पडायचे नाहीच, उलट निर्यातीला आणि शेवटी आम्हालाच फटका बसायचा. दोन वर्षांपूर्वी निर्यात मूल्य 1100 डॉलर केलेलं, तेव्हाही निर्यात सुरूच होती. फटका बसला तो आमच्या मालाला.

आता हे जीवनावश्यकचं खूळ तुम्ही पुन्हा काढलंत. मागे तुमच्या एनडीएचं सरकार असताना कांद्याला जीवनावश्यक वस्तूंच्या यादीत टाकलं होतं. म्हणजे भाव वाढले तर तुम्ही रोखणार. मग भाव पडले की आम्ही वार्‍यावर. साहेब, फक्त उन्हाळ कांद्याचे भाव या दिवसात वाढतात काही महिने… बाकी खरीपाचे 60 टक्के कांदे आम्ही 10 रुपयानं पिकवतो आणि 5 रुपयानं विकतो तेव्हा मायबाप सरकार कुठं जातं? कांदा बाजारात आणण्याचं डिझेलही सुटत नाही तेव्हा. यंदा गारपिटीनं बियाणं झोडपलं. गेल्या वर्षीपर्यंत 1200 रुपये किलो असणारं कांद्याचं बियाणं 3500 रुपये किलोवर गेलं. खतं, औषधं तिप्पट झाली. पेट्रोल, डिझेल डबल झालं. पाण्याचा पत्ता नाही… आम्ही कसा कांदा पिकवायचा आणि तुम्हाला 5 रुपयानं विकायचा तेवढं सांगा…

तुमचा मतदार,
कांदा उत्पादक शेतकरी

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

 • laxman binawade

  Very good article .But what we can do Every politican are same they does nt matter about farmer.

 • ashwin tayade

  excellent article… we need this kind of analysis to unearth hypocrisy shown by all government.

 • Sanjay Panse

  Excellent.You should also add one more comparison with industrial product manufacturer. Can any factory survive if his product is banned for export and same product is imported for lower price? Please also understand that onion is now political commodity or political hot potato . Therefore , I would also give Mr. Modi a suggested way out one long term, i.e. make it international issue.involve WTO ( which is really long term as presently WTO has become non starter). Second,Short term, it would be to arrive at understanding at SAARC level and make onions freely traded within SAARC. ( taste of onion is not much different in SAARC) Our farmers would be ready for such limited international competition in no time.

 • pagar jagruti

  Excellent

close