साहित्य संमेलन स्थळावरून प्रकाशक नाराज

July 4, 2014 1:08 PM0 commentsViews: 217

guhman_samelan04   जुलै :  यंदाचं 88 वं साहित्य संमेलन पंजाबमध्ये होणार असल्यानं बरेचजण आनंदात असले तरी प्रकाशक मात्र नाराज आहेत. आणि या संमेलनाला जायचं की नाही याचा आता विचार चालल्याचं प्रकाशकांचं म्हणणं आहे.

साहित्य संमेलनात ग्रंथप्रदर्शन हे एक मुख्य आकर्षण असतं. दरवर्षी संमेलनात जवळपास दोन ते तीन कोटींची उलाढाल पुस्तकांच्या विक्रीतून होत असते. पण पंजाबमध्ये मराठी लोकांचं वास्तव्य नाही. त्यामुळे तिथे मराठी कार्यक्रम फारसे होत नाही. तसंच इतक्या लांब स्वत:च्या खर्चानं तिथे जाणार्‍यांची संख्याही कमी असेल, अशा वेळेस मराठी पुस्तकांची विक्री कितपत होईल याबद्दल शंका असल्याचं प्रकाशकांचं म्हणणं आहे. आगामी संमेलनात प्रकाशकांना मोठा फटका बसेल याचा विचार साहित्य महामंडळानं करायला हवा अशी अपेक्षाही प्रकाशक संघटनेच्या वतीने व्यक्त करण्यात आली आहे.

दरम्यान, मेहता प्रकाशनाच्या सुनिल मेहता यांनी मात्र या ही भूमिका मान्य नसल्याचं म्हटलं आहे.साहित्य संमेलनामध्ये जाण्यामागे प्रकाशकांचा हेतू हा फक्त पुस्तक विक्री करणे इतकाच नसतो. पुस्तकांची विक्री झाली नाही तरी इतर अनेक पातळ्यांवर काम करता येत असतं. त्या ठिकाणच्या लेखकांशी चर्चा करणे, तिथलं साहित्य आणण्यासाठी प्रयत्न करणे अशा अनेक पातळ्यांवर प्रयत्न केले जात असतात. त्यामुळे फक्त पुस्तक विक्री होईल का नाही याचा विचार करुन प्रकाशक अशी भूमिका घेत असतील तर ती चुकीची आहे असं मेहता यांच म्हणणं आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close