फिल्म रिव्ह्यु : ‘बॉबी जासूस’

July 4, 2014 10:55 PM0 commentsViews: 1632

अमोल परचुरे, समीक्षक

‘शादी के साईड इफेक्टस’ आणि ‘घनचक्कर’ला मिळालेल्या मर्यादित यशानंतर विद्या बालन आणि तिचे फॅन्स ज्या सिनेमाची वाट बघत होते तो सिनेमा आज रिलीज झाला, बॉबी जासूस…लेडी डिटेक्टीव्ह असलेला पहिलाच बॉलीवूड सिनेमा..विद्या बालनची जासूसगिरी, तिची बहुरुपी अदाकारी याची सिनेमा रिलीज व्हायच्या आधीच खूप चर्चा झाली, पण प्रत्यक्ष सिनेमात तेवढी एकच गोष्ट इंटरेस्टिंग वाटली. बाकी अख्खा सिनेमा म्हणजे अनपेक्षित घटनांची सरमिसळ, जी खूप लांबलेली आहे आणि पूर्ण सिनेमात अजिबात थ्रिल नाहीये. बॉबी जासूसपेक्षा सुजॉय घोषचा ‘कहानी’ अनेक पटींनी चांगला होता, असंच म्हणावं लागेल. बॉबीच्या तपासकामाला ठिकठिकाणी फॅमिली ड्रामा, लव्हस्टोरी आणि गाण्यांची ठिगळं लावल्यामुळे जासूसगिरीची मजाच निघून गेलीये. केस अगदी आता सॉल्व्ह होणार आहे, आणि तेव्हाच ड्रीमसाँगमध्ये हिरो हिरॉईन पडक्या किल्ल्यावर गाणं म्हणायला लागतात, जे अर्थातच खूप विचित्र वाटतं. अशाच कारणांमुळे बॉबी जासूस या सिनेमातली बॉबी मस्त आहे पण तिची जासूसगिरी फार जमलेली नाहीये.

काय आहे स्टोरी ?

vidyaaa11हैदराबाद शहरातल्या एका मोहल्ल्यात राहणारी बॉबी…आसपास सगळी मुस्लीम वस्ती आणि अशाच एका मुस्लीम घरातली ही बॉबी… इतर मुलींप्रमाणे तिला नटण्या-मुरडण्यात किंवा लग्न करुन सेटल होण्यात इंटरेस्ट नाहीये. तिचं स्वप्न आहे जासूस बनण्याचं…त्यासाठी शहरातल्या सर्वात मोठ्या डिटेक्टीव्ह एजन्सीकडे नोकरीसाठी ती चकरा मारत असते, पण इथं नोकरीसाठी नुसती पॅशन नाही तर क्वालिफिकेशन पण लागतं तिला सुनावण्यात येतं. तरीही छोट्या छोट्या गोष्टींचा तपास लावत बॉबी जासूसचं काम सुरू असतं. बॉबीचे वडील कडक शिस्तीचे असतात, आणि त्यांना मुलीने रात्री-अपरात्री घराबाहेर राहून डिटेक्टिव्हगिरी करावी हे मान्य नसतं. अशातच बॉबीला एक मोठी केस मिळते आणि इथून सिनेमातलं नाट्य सुरू होतं, पण या केसचा तपास करताना टीव्ही सिरीयलसाठी ऑडिशन घेणं हा सीन खूपच लांबलाय, तसाच क्लायमॅक्स जवळ आलेला असताना बिर्याणी हाऊसचा शोध हा सीनसुद्धा खूपच बोरिंग झालाय. बरं, त्या बिर्याणी हाऊसच्या मालकाला शोधून फार काही साध्य केलेलं नाही, तरीसुद्धा सिनेमात वेळ वाया घालवलाय. हैदराबादसारख्या छोट्या शहरात राहून मोठी स्वप्नं बघणं आणि ती प्रत्यक्षात आणणं हे मुलींसाठी किती कठीण आहे हे वास्तव मात्र सिनेमातून प्रभावीपणे मांडलेलं आहे.

नवीन काय ?

vidyaa6बॉबी जासूस सिनेमाची चर्चा सुरू झाली ती विद्या बालनच्या वेषांतरामुळे..विद्या बालनची वेगवेगळ्या रुपांचं सर्वांनीच कौतुक केलं आणि अर्थातच एक ब्रिलियंट सिनेमा बघायला मिळेल अशी अपेक्षा निर्माण झाली. विद्या बालनने विविध भाषेतील कॅरेक्टर्स करुन बघायची असं ठरवलं असावं. ‘फेरारी की सवारी’मध्ये मराठी लावणी झाली, ‘डर्टी पिक्चर’मध्ये साऊथ इंडियन स्टार झाली, ‘घनचक्कर’मध्ये पंजाबी बीवी करुन झाली आणि आता ‘बॉबी जासूस’मध्ये हैदराबादी मुलगी.. विद्याने हैदराबादी लहेजा चांगला आत्मसात केलाय, वेगवेगळी रुपं सादर करताना मेकअपवरसुद्धा चांगलीच मेहनत घेण्यात आलीये. वेषांतर करणं म्हणजे नुसते केस रंगवणं असले प्रकार सिनेमात नाहीत. पहिल्या फटक्यात ओळखू येणार नाही इतकं विद्याचं रुप बदलण्यात आलंय. एकंदरीत, बॉबीचा रोल विद्याने छान कॅरी केलाय, बाकी सिनेमा कसाही असला तरी विद्याचे फॅन असाल तर केवळ तिच्यासाठी सिनेमा एकदा बघू शकता.

परफॉर्मन्स

232bobby_jasoosधूमसारख्या सिनेमांसाठी आर्ट डिरेक्शन केलेल्या समर शेखचा दिग्दर्शक म्हणून हा पहिलाच सिनेमा. दिग्दर्शनात तो अजून खूप नवखा वाटतोय, एडिटिंगसारख्या तांत्रिक गोष्टींकडे आणखी लक्ष देण्याची गरज होती. सुप्रिया पाठक, तन्वी आझमी अशा कलाकारांबरोबर जे नवोदित कलाकार घेतलेत त्यांची निवडही योग्य वाटत नाही. ‘फुकरे’सारख्या सिनेमात चमकलेला अली फझल इथे विद्याचा हिरो म्हणून एकदमच मिसमॅच वाटतो. गाण्यांमध्येही फार दम नाहीये. एकंदरीत, कथा पटकथा, दिग्दर्शन वगैरेसाठी नाही पण विद्या बालनसाठी फक्त एकदा बघता येईल असा हा बॉबी जासूस आहे.

रेटिंग 100 पैकी 50

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close