मोडतोडीचा विचार हे ‘अधू’ मेंदूचं लक्षण, सेनेचं भाजपवर टीकास्त्र

July 5, 2014 2:16 PM0 commentsViews: 1692

sena_on_bjp_samana05 जुलै : महाराष्ट्राचे नुकसान करणारे ‘अधू’ विचार ना कधी शिवसेनाप्रमुखांनी मांडले, ना आम्ही तशी पावलं टाकली. मोडतोड तांबापितळेचा विचार हे अधू मेंदूचे लक्षण आहे अशा शेलक्या शब्दात शिवसेनेचं मुखपत्र ‘सामना’ मधून भाजपवर टीका करण्यात आलीय. तसंच अधू मेंदूना झटके येतचं राहतील मात्र अशा झटक्यांना कुणी 420 व्होल्टचा झटका मानू नये. बाकी सर्व आलबेल आहे असा टोलाही सेनेनं लगावला.

विधानसभा निवडणुका काही महिन्यावर येऊन ठेपल्या आहेत. लोकसभेत पाच पांडवाची एकत्र आलेल्या महायुतीने घवघवीत यश मिळवलं पण विधानसभेसाठी मात्र जागावाटपाच्या मुद्द्यावरून शिवसेना आणि भाजप या प्रमुख पक्षांमध्ये चांगलीच जुंपलीय. भाजपच्या शिबिरात भाजपचे माजी आमदार मधू चव्हाण यांनी आपण राष्ट्र जिंकलं आता राज्य जिंकू अशी घोषणा करत आता बस्स झालं, आजपर्यंत या युतीत आपण तडजोड करत आलोत त्यामुळे युती तोडून टाका अशी सरळ मागणीच केली. चव्हाण यांच्या मागणीमुळे सभागृहात भाजपच्या कार्यकर्त्यांनी टाळ्याच्या कडकडात स्वागत केलं. पण भाजपचे वरिष्ठ नेत्यांनी सबुरीने घ्या असं सांगत युती तुटणार नाही असं आश्वासन दिलं.

पण यावर शिवसेना काय भूमिका घेते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. युती अभेद्य असून अशा गोष्टींकडे लक्ष देण्याची गरज नाही असा निर्वाळा सेनेनं दिला पण आज अपेक्षेप्रमाणे ‘सामना’तून भाजपच्या स्वबळाचा खरपूस समाचार घेण्यात आला.

महाराष्ट्राचे नुकसान करणारे ‘अधू’ विचार ना कधी शिवसेनाप्रमुखांनी मांडले, ना आम्ही तशी पावलं टाकली. मोडतोड तांबापितळेचा विचार हे अधू मेंदूचे लक्षण आहे अशा शेलक्या शब्दात टीका करण्यात आली. लोकसभा निवडणुकीचे निकाल जसे लागायचे तसेच लागले आहेत. पण या विजयाने हुरळून जाऊ नका, पाय जमिनीवर ठेवा असा सल्ला फडणवीस यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना दिलाय.

सेनेचाही 18 जागांवर विजय होताच जल्लोषी वातावरण राज्यात झाले. आम्हीही शिवसैनिकांना विजयापुढे विनम्र व्हा असेच सुचवले, “या विजयाने उतू नका, मातू नका” असेच बजावले कारण उतणार्‍या आणि मातणार्‍यांना जनतेनं धडा शिकवल्यामुळेच ‘मोदी’ विजयाची पताका फडकली. पण आम्ही आणि भाजपचे मोठे नेते हा विचार करतात तेव्हा अनेकांच्या डोक्यातील अधू मेंदू भलत्याचं दिशेने भरकटत असतात अशी परखड टीकाही करण्यात आली.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close