288 जागा लढण्याची तयारी ठेवा, अजित पवारांचा एल्गार

July 5, 2014 6:57 PM0 commentsViews: 894

1111ajit_pawar_ncp05 जुलै : 144 जागा मिळाल्या नाहीत तर 288 जागा लढवण्याची तयारी ठेवा, असं जाहीर आवाहन राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिलं. शरद पवारांनी आम्हाला सांगितल्याप्रमाणे आम्ही कामाला सुरुवात केलीय आता लवकर जागावाटपावर चर्चा व्हायला हवी तीच सर्वांच्या फायद्याची ठरेल असा इशाराच काँग्रेसला पवारांनी दिला. तसंच 144 जागा काँग्रेसनं द्यावात अन्यथा काय निर्णय घ्यायचा तो त्यावेळी घेऊ असं प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनीही स्पष्ट केलं. कल्याणमध्ये राष्ट्रवादीचा मेळावा पार पडला. त्यानंतर पत्रकार परिषदेत अजित पवारांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

लोकसभेत सपाटून पराभवामुळे राष्ट्रवादीने विधानसभेसाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केलीय. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांची कोंडी करून राष्ट्रवादीचा मार्ग सुकर करण्याचा प्रयत्न केला त्यानंतर आता विधानसभेसाठी अर्ध्या अर्ध्या म्हणजे 144 जागा मिळाव्यात यासाठी अजित पवारांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. 144 म्हणजे 144 जागा देण्यात याव्यात तरच विधानसभेत काँग्रेससोबत लढू असा कडक इशारा अजित पवारांनी शुक्रवारी दिला होता. एवढंच नाहीतर सर्वच पक्षांनी स्वबळावर लढावं असं चॅलेंजही दिलं. त्यानंतर आज (शनिवारी)कल्याणमध्ये राष्ट्रवादीचा मेळावा झाला.

या मेळाव्यातही राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अजित पवारांची पावलावर पाऊल ठेवून स्वबळावर लढावं असा आग्रह धरलाय. राष्ट्रवादी अधिक मजबूत होण्यासाठी नेत्यांनी विधानसभा स्वबळावर लढवण्याचा विचार करावा, अशी मागणीच राष्ट्रवादीचे नेते संजय दिना पाटील यांनी केली.

या मेळाव्यात अजित पवारांनी कार्यकर्त्यांना कामाला लागा आदेश दिले. 144 जागांची मागणी आपण करणार आहोतच पण जर असं झालं नाहीतर त्याठिकाणी 288 जागांची तयारीही ठेवा असं जाहीर आवाहन पवारांनी केलं. तसंच येणार्‍या विधानसभेसाठी सर्वच जागांसाठी उमेदवाराची चाचणी घेऊन योग्य त्या ठिकाणी ताकदीचा उमेदवार दिला जाईल अशी ग्वाहीही पवारांनी दिली. आमच्या नेत्यांनी शरद पवार यांनी आम्हाला सांगितल्याप्रमाणे आम्ही कामाला सुरुवात केलीय. आता लवकर जागावाटपावर चर्चा व्हायला हवी तीच सर्वांच्या फायद्याची ठरेल असंही पवारांनी स्पष्ट केलं.

वैयक्तिक आणि पक्षाची भूमिका काय असते, चर्चेवेळीच सांगू, असा टोलाही अजित पवारांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरेंना लगावला. यावेळी अजित पवारांनी मराठा आणि मुस्लीम आरक्षणाचं श्रेय शरद पवारांना जातं, असं म्हटलंय.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close