संपकरी डॉक्टर आज कामावर परतले नाही तर निलंबन करणार – आरोग्यमंत्री

July 6, 2014 4:09 PM0 commentsViews: 632

Doc strikeDoc strike06  जुलै :  मॅग्मोच्या संपकरी डॉक्टरांचा संप आणखी चिघळणार अशी चिन्हं दिसत आहेत. संपावर गेलेल्या मॅग्मोच्या डॉक्टरांवर आता कडक कारवाईचे स्पष्ट संकेत आरोग्यमंत्र्यांनी दिलेत. डॉक्टर आज कामावर परतले नाही तर निलंबनाची कारवाई करू आणि उद्यापासून नवी भरती प्रक्रिया सुरू होईल, असं आरोग्य मंत्री सुरेश शेट्टी यांनी आयबीएन लोकमतशी बोलताना स्पष्ट केलं आहे.

संपकरी डॉक्टरांवर मेस्माअंतर्गत कारवाई करणार अशी ठाम भूमिका राज्य सरकारने घेतलीय. या कारवाईनंतर कंत्राटी रिक्त जागा भरण्यासाठी विभागीय पातळीवर प्रक्रियाही लगेच सुरू करू असा इशारा सुरेश शेट्टी यांनी दिला आहे. मुख्यमंत्री, आरोग्य मंत्री आणि कॅबिनेट सचिव यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. आंदोलनकर्त्यांशी चर्चेसाठी तयार आहोत मात्र संपकरी डॉक्टरांच्या आठमुठ्या धोरणामुळे आंदोलन चिघळतंय असं राज्याचे शेट्टी यांनी म्हटलं आहे.

तर दुसरीकडे सरकारनं कारवाईचा इशारा दिला असला तरी मॅग्मोचे डॉक्टर मागे हटायला तयार नाही. मागण्या मान्य झाल्या नाहीत तर आंदोलन आणखी तीव्र करणार, असा इशारा डॉक्टरांनी दिला आहे. आजही मुंबई, पुणे, औरंगाबादसह राज्यभर गॅझेटेड डॉक्टर संपावर आहेत. मंगळवारपासून डॉक्टरांनी काम बंद आंदोलन पुकारलं आहे. आझाद मैदानात डॉक्टरांनी ठिय्या मांडला आहे. तर पुण्यातल्या औंध सरकारी हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनी मानवी साखळी करून आंदोलन केलं. मॅग्मोच्या 11 हजार 800 वैद्यकीय अधिकार्‍यांनी आरोग्य मंत्रालयाकडे आपले राजीनामे दिले आहेत.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close