कसाबच्या सुरक्षा व्यवस्थेचा नागरिकांना होतोय त्रास

April 23, 2009 3:23 PM0 commentsViews: 2

23 एप्रिल, मुंबई सुधाकर कांबळेमुंबई हल्ल्यातला अतिरेकी अजमल कसाबच्या सुरक्षा व्यवस्थेमुळं ऑर्थर रोड परिसरातल्या नागरिकांना त्रास होतोय. त्यामुळे ऑर्थर रोड परिसरातल्या नागरिकांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती. त्यावर कोर्टानं एम. एम. टाहिलियानी यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त केलीय. ही समिती सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेणार आहे.आर्थर रोड येथे सध्या 26/11ला मुंबईत झालेल्या हल्ल्याबाबतच्या खटल्याच्या सुनावणीसाठी विशेष न्यायालय स्थापन करण्यात आलं आहे. तसंच याच आर्थररोड जेलमध्ये त्याला ठेवण्यात आलं आहे. कसाबच्या जीवाला असलेला धोका पाहता आर्थररोड परिसरातला साने गुरुजी मार्ग एक दिशा मार्ग करण्यात करण्यात आला आहे. त्यामुळे आपले धंदे बुडल्याचं इथल्या व्यापार्‍याचं म्हणणं आहे. कसाबच्या सुरक्षेसाठी या ठिकाणी भारत तिबेट सुरक्षा दलाच्या जवानांचा बंदोबस्त ठेवण्यात आलाय. या जवानांच्या गस्तीचा इथल्या लहान मुलांवर परिणाम झाला आहे. मुलं प्रचंड घाबरली असल्याचं इथल्या रहिवाशांचं म्हणणं आहे. त्यामुळे आर्थररोड परिसरातल्या व्यापारी तसंच रहिवासी यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. या याचिकेत व्यापारी तसंच रहिवांशांनी ज्याज्या काही मागण्या केल्या आहेत त्यावर आज सुनावणी झाली. यावेळी हायकोर्टाने एक समिती स्थापन केली आहे. ती समिती सर्व बाबींचा आढावा घेणार आहे.हायकोर्टाने न्यायमूर्ती टाहिलियानी यांची समिती स्थापन केली आहे. न्या.टाहिलियानी स्थानिक रहिवाशी, पत्रकारांचे प्रतिनिधी यांच्याशी बोलून अहवाल तयार करणार आहेत. ते आपला अहवाल 27 एप्रिलपर्यंत सादर करतील, अशी माहिती याचिकाकर्त्यांचे वकील एम.के.जैन यांनी दिली. या याचिकेवर 28 एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे. यामुळे आता आर्थर रोड इथल्या या कडक सुरक्षा व्यवस्थेचं भवितव्य 28 तारखेला ठरणार आहे.

close