रेल्वे बजेट : महाराष्ट्राच्या तोंडाला पानं पुसली !

July 8, 2014 5:03 PM0 commentsViews: 2385

2rail_budget_2014_maharashtra08 जुलै : रेल्वेमंत्री सदानंद गौडा यांनी मोदी सरकारचं रेल्वे बजेट सादर केलं. मोदी सरकारने हायटेक फंडा वापरत भव्य दिव्य बुलेट ट्रेनची घोषणा केली. पण या बजेटमध्ये महाराष्ट्राच्या पदरी पुन्हा निराशाच आली. महाराष्ट्रासाठी कर्नाटकसोबत जोडण्यासाठी पंढरपूर -गदक या एकमेव गाडीची घोषणा करण्यात आली.

त्यापाठोपाठ पुणे-नागपूर आणि पुणे-अमृतसर या साप्ताहिक नवीन ट्रेनची घोषणा ही करण्यात आली. त्याचबरोबर हुजूरसाहेब नांदेड-अमृतसर एक्स्प्रेस, नवी दिल्ली-कोल्हापूर शताब्दी या गाडीची घोषणा करण्यात आली. त्यातल्या त्यात महत्वाचा कसारा ते इगतपुरी नवीन लाईन ट्रॅक करण्याची महत्वपूर्ण घोषणा करण्यात आली. तसंच सोलापूर ते तुळजापूर या नवीन लाईन ट्रॅकची घोषणा करण्यात आलीय. पण सर्वसामान्य महाराष्ट्रवासीयांना गेल्या अनेक वर्षांपासून असलेल्या मागण्या साफ धुडकावण्यात आल्या.

मराठावाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रासाठी कोणत्याही नव्या रेल्वेची घोषणा करण्यात आली नाही. मुंबईला तर मागील वर्षीचीच घोषणा पुन्हा करुन वाटाण्याच्या अक्षदा लावण्यात आल्या. महाराष्ट्रात बाहेरुन येणार्‍या रेल्वेची अधिक घोषणा करण्यात आली पण महाराष्ट्राअंतर्गत कोणतीही नवी गाडी मिळाली नाही.

एवढंच नाहीतर मोदी सरकारच्या या बजेटवर एनडीएचा घटक पक्ष असलेला शिवसेनेनंही नाराजी व्यक्त केली. शिवसेनेचे औरंगाबादचे खासदार चंद्रकांत खैरे यांनी बजेटवर नाराजी व्यक्त केली. तर हे बजेट निराशजनक आहे. गेल्या अनेक वर्षांपासून नांदेड, परभणी, हिंगोलीसह मराठवाड्यात रेल्वेचा विस्तार झाला नाही या बजेटमध्ये फक्त किरकोळ गोष्टींवर लक्ष देण्यात आलं या बजेटने घोर निराशा केली अशी टीका काँग्रेसचे खासदार अशोक चव्हाण यांनी केली. तर रेल्वे बजेटमध्ये महाराष्ट्राच्या तोंडाला पानं पुसली असल्याची टीका मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलीये. तसंच या बजेटचा निषेध करत असल्याचंही ते म्हणाले.

महाराष्ट्राच्या पदरी पुन्हा निराशाच

- हुजूरसाहेब नांदेड-अमृतसर एक्स्प्रेस घोषणा
- पुणे-नागपूर आणि पुणे-अमृतसर नव्या साप्ताहिक गाड्या
- गदक-पंढरपूर नवीन गाडी
- कसारा-इगतपुरी नवीन लाईन ट्रॅक
- सोलापूर-तुळजापूर नवीन लाईन ट्रॅक
- नवी दिल्ली-कोल्हापूर शताब्दी ट्रेनची घोषणा
- मुंबई-गोरखपूर जनसाधारण एक्स्प्रेसची घोषणा
- मुंबई-नवी दिल्ली प्रिमिअम एसी एक्स्प्रेसची घोषणा
- मुंबई-पटियाला ट्रेनची घोषणा

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close